मुंबई उद्या ‘सुपरकूल’; तापमानात 13 अंशांपर्यंत विक्रमी घसरण होणार

नवीन वर्ष उजाडल्यापासून मुंबईत मुक्कामी असलेल्या थंडीची तीव्रता वाढणार आहे. रविवारी किमान तापमान 16 अंशांपर्यंत खाली आले. यात पुढील दोन दिवसांत मोठी घसरण सुरू राहणार आहे. मंगळवारी यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद होईल, किमान तापमानात 13 अंशांपर्यंत विक्रमी घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या दिवशी मुंबईकर ‘सुपरकूल’चा अनुभव घेऊ शकणार आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरांत मागील काही दिवसांपासून सकाळी आल्हाददायी वातावरण आहे. किमान तापमान 20 अंशांच्या खालील पातळीवर नोंद होत आहे. शहराच्या दिशेने उत्तरेकडील वारे प्रवाहित राहिले आहेत. तसेच आकाश निरभ्र झाल्याने शहरातील थंडीची तीव्रता वाढली आहे. रविवारी किमान तापमानासह कमाल तापमानात घट नोंद झाली होती. सांताक्रुझमध्ये कमाल 31.4 आणि किमान 16.6 अंश तापमान होते. याचवेळी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 36 टक्के होती. मंगळवारी कमाल तापमान 31 अंशांच्याच आसपास राहील, मात्र किमान तापमानात विक्रमी घट नोंद होणार आहे. त्यानंतर आणखी दोन दिवस थंडीची तीच तीव्रता कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र्ा विभागाने वर्तवला आहे.

शहर आणि उपनगरांत बहुतांश ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक पातळीवरच होता. केवळ कुलाबा आणि बोरिवली येथे चांगल्या हवेची नोंद झाली. या दोन ठिकाणी अनुक्रमे 56 आणि 91 इतका ‘एक्यूआय’ नोंद झाला.

हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीतच!

शहराच्या हवेतील प्रदूषण अद्याप चिंताजनक पातळीवरच आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ अॅपवर नोंदवलेल्या आकडेवारीनुसार रविवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीतच होती. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास 118 इतका हवेचा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला. कुर्ला, कांदिवली, शीव आणि विलेपार्ले या परिसरातील हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत होती.

Comments are closed.