भुयारी मेट्रोमधून 7 कोटींहून अधिक मुंबईकरांचा प्रवास, दैनंदिन प्रवासी संख्या सव्वा दोन लाखांवर
आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंतच्या संपूर्ण भुयारी मेट्रो मार्गिकेच्या सेवेला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभराच्या कालावधीत भुयारी मेट्रोचे प्रवासी वेगाने वाढले. आतापर्यंत एकूण 7 कोटींहून अधिक मुंबईकरांनी भुयारी मेट्रोतून प्रवास केला असून या मार्गिकेवरील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या सव्वा दोन लाखांवर पोहोचली आहे. संपूर्ण मार्गिका खुली झाल्यानंतर मुंबईकरांचा उपनगरातून दक्षिण मुंबई गाठण्याचा प्रवास सुकर झाला आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत ‘अॅक्वा लाईन’ची प्रवासी सेवा हाताळली जात आहे. पश्चिम उपनगरातील आरे जेव्हीएलआर ते दक्षिण मुंबईतील कफ परेड या संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू होऊन गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. याचदरम्यान ‘अॅक्वा लाईन’ने 7,18,52,473 प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली. मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिकेला मुंबईकरांकडून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचा दावा मेट्रो प्रशासनाने केला आहे. प्रवासी संख्येचा 7 कोटींचा टप्पा ओलांडण्यात यश आल्याबद्दल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मुंबईकरांचे आभार मानले.
सप्टेंबरमध्ये विक्रमी दैनंदिन प्रवासी
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांनी ‘अॅक्वा लाईन’ला पहिली पसंती दिली. त्यामुळे सप्टेंबरमध्ये विक्रमी दैनंदिन प्रवासी संख्या नोंद झाली. गेल्या महिन्यात सोमवार ते शुक्रवार दररोज सरासरी 2,24,602 प्रवाशांनी, तर वीकेण्डला म्हणजेच शनिवार आणि रविवार या दिवशी दररोज सरासरी 1,31,138 प्रवाशांनी ‘अॅक्वा लाईन’ने प्रवास केला.
मेट्रो मार्गिकेवर दोन विशेष उपक्रम
महत्त्वपूर्ण टप्प्याच्या निमित्ताने ‘अॅक्वा लाईन टाईम पॅप्सुल’ आणि ‘अॅक्वा लाईन पासपोर्ट व शिक्का’ हे दोन विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत. ‘अॅक्वा लाईन टाईम पॅप्सुल’ उपक्रमांतर्गत ‘अॅक्वा लाईन’च्या उभारणीपासून ते तिच्या कार्यान्वयनापर्यंतच्या प्रवासातील महत्त्वाची कागदपत्रे, छायाचित्रे, महत्त्वाचे टप्पे आणि आठवणी जतन केल्या जाणार आहेत. तसेच ‘अॅक्वा लाईन पासपोर्ट व शिक्का’ या उपक्रमांतर्गत प्रवाशांना मार्गिकेवरील निवडक स्थानकांना भेट देऊन तेथील वैशिष्टय़पूर्ण स्थानक-शिक्का संग्रहित करता येणार आहेत.
Comments are closed.