पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ, विद्यापीठाकडून पेट्रोल गाडय़ांची खरेदी
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाची बचत करा, सोने खरेदी टाळा आणि शासकीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, मुंबई विद्यापीठाने या आवाहनाला हरताळ फासत चार नवीन पेट्रोल गाडय़ा खरेदी केल्या आहेत. यावर युवासेनेने आक्रमक भूमिका घेत विद्यापीठाला मनमानी कारभाराचा जाब विचारला आहे.
मुंबई विद्यापीठ ही एक स्वायत्त संस्था असल्याने त्यांना हे नियम लागू होत नसल्याचे सांगत विद्यापीठाने नवीन पेट्रोल गाडय़ांची खरेदी केली. विद्यापीठाच्या अनेक गाडय़ा भंगारात पडून असून त्यांची अद्याप विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. असे असताना नवीन गाडय़ा खरेदी करणे म्हणजे विद्यार्थ्यांकडून शुल्क स्वरूपात वसूल केलेल्या पैशांवर डल्ला मारल्यासारखे असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या उधळपट्टीविरोधात युवासेना सिनेट सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. इंधन बचत करणे याकरिता इलेक्ट्रिक अथवा सीएनजी गाडय़ांचा पर्याय उपलब्ध असताना मनमानी कारभार का, असे प्रश्न युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी उपस्थित करत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले.
विद्यापीठाने उद्भासन करावा
गाडय़ा खरेदी करताना शासनाची परवानगी घेण्यात आली होती का आणि भंगारात असलेल्या गाडय़ा विद्यापीठाच्या बाहेर कधी जाणार याचा खुलासा विद्यापीठाने करावा अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, व्यवस्थापन परिषद सदस्य मिलिंद साटम आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी निवेदन देऊन केली आहे.
Comments are closed.