रघुवंशी-मुशीरची शतकी तोफ, पहिल्या दिवशी हरियाणाच्या गोलंदाजांची धुलाई; मुंबईची 3 बाद 290 अशी जबरदस्त सुरुवात

रणजी करंडकाच्या रणांगणावर मुंबईने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली. हरियाणाविरुद्धच्या लढतीत अंगक्रिश रघुवंशी आणि मुशीर खान या युवा फलंदाजांनी शतकी धमाका करत पहिल्या दिवसावर मुंबईचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर दिवसाचा खेळ संपला, तेव्हा मुंबईने 82 षटकांत 3 बाद 290 धावा फटकावल्या होत्या. दोन युवा फलंदाजांची शतके आणि दुसर्या विकेटसाठी झालेली 208 धावांची भागीदारी हे मुंबईच्या डावाचे सर्वांत मोठे वैशिष्टय ठरले.

हरियाणाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. खेळपट्टीवर हिरवळ दिसत असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल, अशी अपेक्षा हरियाणाला असावी. मुंबईचा सलामीवीर दिव्यांश सक्सेना अवघ्या 10 धावांवर बाद झाला आणि हरियाणाच्या निर्णयाला सुरुवातीला दुजोरा मिळाल्यासारखे वाटले. मात्र, त्यानंतर मैदानावर जे घडले, त्याने सामन्याचे चित्रच बदलून टाकले

रघुवंशी–खानची द्विशतकी भागी

अंगक्रिश रघुवंशी आणि मुशीर खान यांनी दुसर्या विकेटसाठी अशी भक्कम भिंत उभी केली की हरियाणाच्या गोलंदाजांना यशासाठी दीर्घकाळ झगडावे लागले. रघुवंशीने 180 चेंडूंत 13 चौकार आणि एका षटकारासह 114 धावा केल्या. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक ठरले. दुसर्या बाजूला मुशीरने 185 चेंडूंत 12 चौकार आणि एका षटकारासह 109 धावांची देखणी खेळी साकारली. त्याने या स्पर्धेतील तिसर्या अर्धशतकाचे शतकात रूपांतर केले. दोघांनी 208 धावांची भागीदारी करून मुंबईचा डाव भक्कम पायावर उभा केला.

पहिला दिवशीच विजयाचा पाया

रघुवंशी बाद झाल्यानंतरही मुंबईच्या धावांचा वेग थांबला नाही. दिवसअखेर कर्णधार सिद्धेश लाड 29 धावांवर, तर सरफराज खान 20 धावांवर नाबाद होते. मुंबईने पहिल्या दिवशी तीनच विकेट गमावल्या असल्यामुळे दुसर्या दिवशी मोठया धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी कायम आहे. मुंबईने हिमाचल प्रदेश आणि चंदिगडविरुद्धच्या लढतीत पहिल्या दिवसावर आपले वर्चस्व गाजवत विजयाचा पाया रचला होता आणि दोन्ही सामने डावाने जिंकत बोनस गुणाची कमाई केली. आजचाही खेळ त्याच दिशेने वाटचाल करतोय. अजून तीन दिवस शिल्लक आहेत, पण हरियाणाला दुसर्या दिवशी लवकर विकेट मिळवून मुंबईला मोठी आघाडी घेण्यापासून रोखावे लागेल. मात्र, पहिल्या दिवसाच्या खेळावरून मुंबईच्या युवा फलंदाजांनी विजयाच्या हॅटट्रिकचा पाया रचल्याचे दिसून आले आहे.

रणजी फेरी

बिहारची ९९ धावांत घसरगुंडी

बिहारविरुद्ध मध्य प्रदेशने पहिल्याच दिवशी सामन्यावर पकड मिळवली. बिहारचा पहिला डाव अवघ्या 30.3 षटकांत 99 धावांत संपला. त्यानंतर मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळाची सांगड घालत दिवसअखेर 57 षटकांत 3 बाद 261 धावा केल्या.

बडोदा 6 नंतर २५९

गतविजेत्या जम्मू-काश्मीरविरुद्ध बडोद्याने पहिल्या दिवसअखेर  86 षटकांत 6 बाद 259 धावा केल्या. बडोद्याने समाधानकारक धावसंख्या उभारली असली, तरी दिवसअखेर उर्वरित चार विकेट सांभाळणे आणि धावगती वाढवणे हे आव्हान असेल.

मेघालयाचा ३८५ धावांचा डोंगर

प्लेट गटात मेघालयने मिझोरामविरुद्ध पहिल्या दिवशी धावांचा पाऊस पाडला. अजय दुहान आणि कर्णधार किशन लिंगडोह यांनी वैयक्तिक शतकासह तिसर्या विकेटसाठी 308 धावांची विक्रमी भागी रचत मेघालयाला पहिल्या दिवसअखेर 2 बाद 385 धावांचा डोंगर उभारून दिला.

गोव्याचे आठ फलंदाज बाद

नागपूरमध्ये विदर्भाविरुद्ध गोव्याची फलंदाजी दबावाखाली आली. गोव्याने 86 षटकांत 8 बाद 204 धावा केल्या. दोनशे धावांचा टप्पा गाठला असला, तरी आठ विकेट गमावल्यामुळे गोव्याला मोठी धावसंख्या उभारण्याचे आव्हान आहे.

खराब प्रकाशाचा अडथळा

पुदुच्चेरीविरुद्ध उत्तर प्रदेशच्या 67 धावा झाल्या आणि सामना खराब प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला.

Comments are closed.