सरफराझ की मुशीर… की गफलत? धावफलकामुळे बीसीसीआयची ‘हिट विकेट’, रणजीच्या पहिल्याच दिवशी गोंधळाचा चौकार

हिंदुस्थानचा क्रिकेट हा धर्म, आणि रणजी ट्रॉफी म्हणजे त्या धर्माचा वार्षिक उत्सव. पण या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी बीसीसीआयने असं काही केलं की भक्तच बुचकळय़ात पडले.

श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर मैदानावर मुंबईचा सामना जम्मू-कश्मीरशी सुरू होता. पण सामना सुरू होण्याआधीच स्कोअरकार्डने सामना जिंकला! कारण बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाइटवर सरफराझ खानला ‘ओपनर’ दाखवलं गेलं आणि तोही शून्यावर बाद!

सगळय़ांचे डोळे विस्फारले, अरे, सरफराज ओपनिंग कधीपासून करतोय? सोशल मीडियावर सरफराझ डक आणि रणजी मिक्सअप ट्रेंड व्हायला लागले. मग लक्षात आलं की खरं तर ओपनिंग मुशीर खानने केली होती, सरफराझच्या लहान भावाने. पण स्कोअरकार्डमधल्या गफलतीने मोठय़ा भावाचं ‘डक’ झालं आणि चाहत्यांच्या भावना आऊट झाल्या!

बीसीसीआयने लगेच चूक दुरुस्त केली, पण तेव्हापर्यंत क्रिकेटप्रेमी म्हणत होते – “अरे बाबा, एवढय़ा मोठय़ा बोर्डाने स्कोअरकार्डचं ‘फॅक्ट चेकिंग’ करायला कोणी ठेवलं नाही का?’’

सरफराझ मात्र शांत होता – “गोंधळ झाला तर झाला, आता बॅटने उत्तर देतो.’’ आणि दिलंही! 48 चेंडूंत 42 धावा-सहा चौकार, एक षटकार. रन आऊट झाला, पण आधीच ‘रन’ काढलेले असल्याने आत्मविश्वास कायम राहिला.

मुंबईने दिवसअखेर 302/5 अशी मजबूत मजल मारली. सिद्धेश लाड (86) आणि शम्स मुलानी (23) हे दोघे खेळत होते.

या सगळय़ा नाटय़ानंतर रणजी 2025-26 हंगामाची रंगत वाढलीच. 91 वा हंगाम, 38 संघ आणि उत्साह पूर्वीपेक्षा दुप्पट. गतविजेता विदर्भ आपला किताब टिकवायला सज्ज, तर मुंबईचा आत्मविश्वास नेहमीप्रमाणे आभाळाएवढा.

Comments are closed.