पाच महिन्यांत दोन हजार 257 बेकायदा जल जोडण्या कापल्या; चोरीच्या पाण्यावर दुप्पट दंडाने कारवाई

मुंबईला सध्या 4665 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना पाण्याच्या उपलब्धतेनुसार 4100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. म्हणजेच 565 दशलक्ष लिटर कमी पाणीपुरवठा केला जातो. यामुळे पुरवठय़ात 5 ते 10 टक्के पाण्याची तूट दिसून येते. यातच मोठय़ा प्रमाणावरील पाणीचोरी, बेकायदा कनेक्शनमुळे पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे जानेवारी ते मे 2026 या कालावधीत प्रशासनाने केलेल्या कारवाईत तब्बल 2 हजार 257 बेकायदा जल जोडण्या कट करण्यात आल्या आहेत. शिवाय चोरीच्या पाण्यावर दुप्पट दंडही आकारण्यात आला आहे.

विधान परिषदेत आज आमदार राजहंस सिंह यांनी लक्षवेधी सूचना मांडून मुंबईतील अपुरा पाणीपुरवठा, पाणीचोरी, बेकायदा कनेक्शनवर प्रश्न उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्र्याच्या वतीने नगरविकास विभागाकडून मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. यामध्ये वाहन धुण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरण्यात येणाऱ्या जलजोडण्या, बेकायदा कनेक्शन, पाणीचोरी अशा प्रकारांत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. तोडलेल्या जलजोडण्यांची पाहणी 90 दिवसांत पुन्हा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईला तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अपर वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा धरणांमधून 4100 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यातील भातसा आणि अपर वैतरणा ही धरणे राज्य सरकारच्या मालकीची असून उर्वरित धरणे मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबईतील पाणीटंचाई रोखण्यासाठी पाणीचोरीवर एफआयआयनुसार कठोर कारवाई करावी, ज्या इमारतींना पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी टाक्या बांधून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी केली.

गारगाई, दमणगंगा, निःक्षारीकरण प्रकल्प तारणार

मुंबईची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता गठीत करण्यात आलेल्या माधवराव चितळे समितीच्या शिफारशीनुसार मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दररोज 440 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणारे गारगाई प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 2030 पर्यंत हे धरण पूर्ण होईल.

मालाड-मनोरी येथे 400 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करणारा निःक्षारीकरण प्रकल्प तर अंधेरी वर्सोवा येथे 200 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणारा निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. शिवाय भविष्यात दमणगंगा व पिंजाळ नदीजोड प्रकल्पही प्रस्तावित आहे.

Comments are closed.