मोदी स्टेडियमवर मुंबईकरांचा आवाज
टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून अहमदाबादकडे क्रिकेटप्रेमींचा अक्षरशः निळासागर वाहत होता. अहमदाबादकडे नियमित जाणाऱया 16 ट्रेन्स हाऊसफुल्ल झाल्यानंतर क्रिकेटप्रेमी मुंबईकरांच्या अभूतपूर्व मागणी पाहता रेल्वे प्रशासनाने मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरिवली येथून विशेष वर्ल्ड कप ट्रेन सोडल्या होत्या. ज्या खचाखच भरल्या होत्या. एकटय़ा मुंबई आणि उपनगरातून 25 हजारांपेक्षा मुंबईकर क्रिकेटप्रेमी निळी जर्सी घालून ‘भारत माता की जय’च्या जयघोषात निघाले होते. ट्रेन फुल्ल असल्यामुळे बसेस आणि खासगी वाहनांनीही हजारो मुंबईकरांनी अहमदाबादच्या मोदी स्टेडियमच्या दिशेने धाव घेतली होती. त्यामुळे हातात तिरंगा, अंगावर निळी जर्सी आणि ओठांवर ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत क्रिकेटप्रेमींचा उत्साह अहमदाबाद रेल्वे स्थानकावर ओसंडून वाहत होता.
हिंदुस्थानी संघाला जगज्जेते बनविण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये देशाच्या कानाकोपऱयातून चाहते दाखल झाले, पण यात सर्वाधिक आकडा मुंबईकरांचा होता. त्यामुळे स्टेडियम ‘भारत माता की जय’बरोबर ‘गणपती बाप्पा मोरया’चाही जयघोष सुरू होता.
संजूची ठोकशाही
संजू सॅमसनचा आजचा डाव म्हणजे क्रिकेटच्या खेळपट्टीवर रंगलेली ठोकशाहीच. सातत्याने धावांचा पाऊस पाडणाऱया संजूनं आजही घणाघाती अर्धशतक ठोकत अनोखी हॅटट्रिक पूर्ण केली. तो आज षटकारांचा पाऊस पाडत होता. न्यूझीलंडच्या एकेका गोलंदाजाची अवस्था अशी झाली की, जणू एखाद्याला खांबाला बांधून चाबकाने फोडतोय. तशी संजूने त्यांची धुलाई केली. अर्धशतकांच्या हॅटट्रिकनंतर त्याला सलग शतकाची विक्रमाची संधी होती, पण तो थोडक्यात चुकला आणि तीन सामन्यांत दुसऱयांदा 89 धावांवर तो बाद झाला. त्याने 46 चेंडूंत 8 षटकार आणि 5 चौकारांसह वणवा पेटवला.
जगज्जेतेपदाचा दिग्विजय
जगज्जेतेपद राखणे आणि यजमान जगज्जेते असा दुहेरी इतिहास रचण्याचे ध्येय समोर ठेवून सूर्यकुमार यादव टॉससाठी उतरला, पण तो जिंकला मिचेल सॅण्टनरने. त्याने गोलंदाजांना लाभ मिळावा म्हणून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा ठरवण्याची करामात संजू आणि अभिषेकने करून दाखवली. पूर्ण स्पर्धेत एक अर्धशतक वगळता पूर्णपणे अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माला न वगळता आणखी एक संधी दिली आणि त्याने या संधीचे तुफान केले. दोघांनी पॉवर प्लेच्या सहा षटकांत 92 धावा करत स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम सलामी दिली. अभिषेकने 18 चेंडूंत पन्नाशी साकारताना 3 षटकार आणि 6 चौकार खेचले. 98 धावांच्या भागीनंतर ही जोडी रचिन रवींद्रने फोडली.
पहिली शतकी भागी
संजूला आज विश्वविक्रम रचण्याची संधी होती. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात एकाही फलंदाजाला लागोपाठ दोन शतके ठोकता आली नाही. आज संजू त्या विक्रमाच्या समीप पोहोचला होता. इशानही फटकेबाजीत जराही ऐकत नव्हता. त्यानेही षटकारबाजी करत अर्धशतक साजरे करत स्पर्धेत 300 धावांचा टप्पा ओलांडला. हा विक्रम संजूनेही केला. दुसऱया विकेटसाठी 105 धावांची भागी रचत हिंदुस्थानला 300 धावांच्या एव्हरेस्टचे स्वप्न दाखवले.
निशामने केली करामत
15 षटकात 203 धावा करणारा हिंदुस्थान 300 च्या पारही जाऊ शकतो, हे संजू-इशानची फलंदाजी संकेत देत होते. तेव्हा गोलंदाजीला आलेल्या निशामने आधी संजूची विकेट काढली. त्याचा अफलातून झेल मॅकान्चीने टिपला. मग इशानचेही संतुलन बिघडले. त्याचाही जबरदस्त झेल चॅपमनने घेतला आणि पाचव्या चेंडूवर सूर्यकुमारचीही विकेट काढत 1 बाद 203 वरून हिंदुस्थानची 4 बाद 204 अशी घसरगुंडी उडवली. निशामच्या या तिहेरी धक्क्यामुळे हिंदुस्थानच्या फटक्यांवर बंधने आली. पण निशामच्या शेवटच्या षटकात शिवम दुबेने 2 षटकार आणि 3 चौकार खेचत 24 धावा काढत संघाला अडीचशेपार पोहोचवले.
Comments are closed.