मुंबईकरांना प्रदूषणापासून तात्पुरता दिलासा; सलग तिसऱ्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मागील दीड महिन्यापासून तीव्र प्रदूषणाच्या प्रश्नामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली आहे. हवेतील धूलीकण वाऱ्याच्या वेगामुळे इतरत्र विखुरले जात आहेत, असे हवामानशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. शनिवारीपासून हवेचा गुणवत्ता निर्देशांक अर्थात एक्यूआय ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंद होत आहे.

सोमवारी संपूर्ण दिवसभर मुंबईसह आसपासच्या भागातही हवेची गुणवत्ता समाधानकारक राहिली. ठाण्यात 82, कल्याणमध्ये 68 आणि नवी मुंबईमध्ये 78 अशा एक्यूआयची नोंद झाली. मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे 77, बोरिवली पूर्व-58, भायखळा – 46, अंधेरी पूर्व – 90, चेंबूर – 56, कुलाबा – 58 आणि देवनार येथे 92 अंक एक्यूआयची नोंद करण्यात आली. मागील दीड महिन्यांत शहराच्या अनेक भागातील एक्यूआय 175 ते 200 अंकांच्या आसपास नोंद होत होता. हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत पोहोचल्यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास होत होता. विशेषतः श्वसनविकार आणि हृदयविकाराचा सामना करणाऱ्या नागरिकांना प्रदूषण जीवावर बेतण्याची भीती निर्माण झाली होती.

वातावरणातील बदलामुळे शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारला आहे. ही परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने बांधकाम प्रकल्पांना मार्गदर्शक तत्वे आखून द्यावीत, अशी मागणी मुंबईकरांमधून जोर धरत आहे.

Comments are closed.