जीवनवाहिनी बनली जलवाहिनी, रेल्वे रूळ पाण्याखाली; लोकलच्या लांबलचक रांगा, सीएसएमटी ते ठाणे सेवा ठप्प, लाखो प्रवाशांची त्रेधातिरपीट

मंगळवारी सकाळी धो-धो कोसळलेल्या पावसात मुंबईकरांची ‘जीवनवाहिनी’ अक्षरशः ‘जलवाहिनी’ बनली. मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. पुर्ला, चुनाभट्टी, दादर, माटुंगा परिसरात रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. त्यामुळे मेन लाईनवरील लोकलसेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे स्थानकांदरम्यान पूर्णपणे ठप्प झाली. तसेच हार्बरवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी स्थानकापर्यंत लोकलसेवा बंद करण्यात आली. यादरम्यान लोकल ट्रेनच्या लांबलचक रांगा लागल्या. सायंकाळपर्यंत सेवा पूर्वपदावर आली नाही. या गोंधळात भरपावसात लाखो प्रवाशांची त्रेधातिरपीट उडाली. कुर्ला, ठाणे, दादर, घाटकोपर स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली.

सकाळी 11.25 वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कुर्ला ते शीव स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील लोकल वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर पुढील 20 मिनिटांतच धिम्या मार्गावरील लोकलसेवा बंद केली. तसेच चुनाभट्टी स्थानक परिसरात रूळ पाण्याखाली गेल्याने हार्बरची सेवा ठप्प झाली. सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टीपर्यंतची लोकल वाहतूक बंद केली. नंतर पावसाचा जोर आणखी वाढत गेल्याने पनवेलपर्यंतच्या संपूर्ण लोकल सेवेवर परिणाम झाला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे लोकल सेवा बंद करावी लागली. दुपारी एकच्या सुमारास कुर्ला स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्मवर लोकल उभ्या करण्यात आल्या. काही लोकल प्लॅटफॉर्मपासून दूर अंतरावर उभ्या केल्याने प्रवासी रुळावर खाली उतरले. त्यात वृद्ध नागरिक, महिला प्रवाशांची संख्याही अधिक होती. त्यांना रुळावरून प्लॅटफॉर्मवर घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी मदत केली.

रेल्वेच्या देखभालीतील अपयशाचा फटका

रेल्वे प्रशासनाने मान्सूनपूर्व कामे योग्यरीत्या केली नाहीत. त्याचा फटका सलग दोन दिवस प्रवाशांना बसला. रुळालगतचे नाले, गटारांची सफाई योग्यरीत्या न केल्याने अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात कचरा अडकला. त्यामुळे जागोजागी रेल्वे रुळावर पाणी साचले. रेल्वेच्या अपयशावर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

बेस्टच्या बसेस जागोजागी अडकल्या

अनेक रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी साचल्याने मुंबईकरांची ’दुसरी जीवनवाहिनी’देखील ढेपाळली. दादरपासून विलेपार्ले, गोरेगाव, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला परिसरात जागोजागी बेस्टच्या अनेक बसेस अडकल्या. कित्येक बसमध्ये पाणी शिरले, कित्येक बस मधेच नादुरुस्त झाल्या. 100 हून अधिक बसफेऱ्या नियोजित मार्गावरून न नेता अन्य मार्गावर वळवल्या. यात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

तब्बल 250 विमान उड्डाणांना फटका

सलग दुसऱया दिवशी कोसळलेल्या मुसळधार पावसाचा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. दिवसभरात तब्बल 250 हून अधिक विमान उड्डाणांची सेवा विस्कळीत झाली. कमी दृश्यमानतेमुळे अनेक उड्डाणे अचानक रद्द करण्यात आली. या सर्व गोंधळात शेकडो प्रवासी तासन्तास विमानतळावर खोळंबले. यात लहान मुले, वृद्ध नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

Comments are closed.