मुंबईतील 25 हजार कोटींच्या प्रकल्पांचे महिनाभरात टेंडर, मुख्यमंत्र्यांचा पालिका निवडणुकीवर डोळा
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार सक्रिय झाले आहे. मुंबईतील 25 हजार कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पांची टेंडर प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यावरून चर्चा सुरू झाली असून इतकी घाई कशासाठी? हा नवा घोटाळा तर नाही, असा सवाल केला जात आहे. मुंबईच्या विकासासाठी प्रकल्प हवे आहेत; पण ते पारदर्शीपणे राबवले जावेत अशी मुंबईकरांना अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सुमारे 1 लाख 41 हजार कोटींच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच 25 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचाही आढावा घेतला. नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
या प्रकल्पांचा समावेश
पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रकल्प, आरोग्य विभागाचे 1 लाख 41 हजार 356 कोटी रुपयांचे प्रकल्प, 700 किमी किलोमीटर रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाची कामे, वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्ग, गोरेगाव मुलुंड लिंक रोडसह गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल, सायन पूल, मढ-वर्सोवा पूल आदी पुलांची कामे, दहिसर, पोईसर, ओशिवरा नदी पुनर्जीवीकरण व मिठी नदी स्वच्छता प्रकल्प, यासह पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच वर्सोवा, मालाड, भांडूप, घाटकोपर येथील मलजल उदंचन केंद्र, वर्सोवा मलजल बोगदा, मिठी नदी पॅकेज मलजल बोगदा व प्राधान्य मलजल बोगदा, शीव, केईएम व नायर रुग्णालयांचा पुनर्विकास व नवीन रुग्णालयांची उभारणी, दहिसर पश्चिम द्रुतगती मार्गावरील ऑक्ट्रॉय नाका व मानखुर्द येथे वाहनतळ व व्यावसायिक केंद्र उभारणे.
पायाभूत सुविधा
तसेच निक्षारीकरण प्रकल्प, मिठी नदी पॅकेज 5, पांजरापोळ जलशुद्धीकरण प्रकल्प, दहिसर उद्यान विकास, मानखुर्द वाहतूक केंद्र, जिजामाता उद्यान विस्तारीकरण व मुलुंड पक्षी संग्रहालय, देवनार बायोमायनिंग, देवनार पशुवध आधुनिकीकरण, मध्यवर्ती उद्यान पायाभूत सुविधा व गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प या सुमारे 25 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
मिंधेंना कोस्टल रोडवर हवे हेलिपॅड
सध्या बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने 700 किमी रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील 2 हजार कि.मी रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच सागरी किनारी मार्गावर (कोस्टल रोड) हेलिपॅड उभारण्यासंदर्भातही विचार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
Comments are closed.