शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळ! एबी फॉर्मची पळवापळवी, रडारड आणि आक्रोश!! महायुतीत राडा! नाराजांचा उद्रेक… आयारामांविरोधात निष्ठावंतांचे बंड
महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारीवरून राज्यातील सत्ताधारी महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीची बोलणी फिस्कटल्याने पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या नावाने थयथयाट केला. त्यातच उमेदवारी डावलल्याने संतप्त झालेल्या एका भाजप कार्यकर्तीने पक्ष कार्यालयात राडा घालत आक्रोश केला. पुण्यात शिंदे गटाच्या उमेदवाराचा एबी फॉर्मच कुणीतरी पळवून नेला. नाशिकमध्ये भाजपचे शहर अध्यक्ष एबी फॉर्म घेऊन गाडीतून पळाले. इच्छुक उमेदवारांनी गाडय़ा घेऊन त्यांचा पाठलाग केल्याने एकच थरार उडाला. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत उमेदवारी डावलल्याने काही ठिकाणी बंडाचे निशाण फडकवत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा केला. नवी मुंबईत आपल्या समर्थकांना सही नसलेले एबी फॉर्म दिल्याने भाजप आमदार मंदा म्हात्रे चांगल्याच संतापल्याचे दिसून आले.
मुंबईत इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी भाजप-शिंदे गटाने काही ठिकाणी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर केली खरी, पण उमेदवारी न मिळाल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बंडाचे निशाण फडकवत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याशिवाय उमेदवारी निश्चित करण्यात पुढाकार घेणाऱ्यांच्या नावाने घोषणाबाजी करत शिमगा केला. दहिसरमध्ये शिंदे गटाला हवा असलेला वॉर्ड भाजपला सोडल्याने आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी राडा घातला. गोरेगावमध्ये भाजपचे विधानसभा महामंत्री संदीप जाधव यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर मुलुंडमध्ये विधानसभा महामंत्री प्रकाश मोटे, कमलाकर दळवी यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत रोष व्यक्त केला.
पुण्यात महायुतीवरून सावळा गोंधळ
पुण्यात शिंदे गटाचे नाना भानगिरे यांनी महायुती तुटल्याचे जाहीर केले. त्यानंतर 165 जागांवरील उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यात आले. परंतु त्यानंतर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी युती तुटली नसून चर्चा अजूनही सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
जालन्यात भाजप–शिंदे गटाची काडीमोड
जालना महापालिकेतही भाजप-शिंदे गटाचा काडीमोड झाला. भाजपच्या मोक्याच्या जागांवर मिंध्यांनी कब्जा सांगितल्याने आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार पैलास गोरंटय़ाल यांनी पत्रकारांना सांगितले. निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजप आणि शिंदे गटात चर्चेचे गुऱहाळ चालू होते. भाजपने शिंदे गटाला 30 जागा देऊ केल्या. परंतु त्यांनी हा प्रस्ताव नाकारून आम्ही 35 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर गोरंटय़ाल यांनी चर्चा संपली असून आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने माजी नगरसेविका संगीता पाचगे यांनी प्रचंड गोंधळ घातला. तिकिटासाठी पक्षांतर करूनही आपल्याला डावलण्यात आल्याचे कळताच पाचगे यांनी गोरंटय़ाल यांचे पाय धरले. हा सगळा गोंधळ पाहून गोरंटय़ाल यांच्यावर काढता पाय घेण्याची वेळ आली.
लातुरात महायुती विस्कटली
लातूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये आघाडीसाठी चर्चेचे गुऱहाळ सुरू होते. परंतु राष्ट्रवादीमधील काही नेत्यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकल्याने सगळा विस्कोट झाल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केला. राष्ट्रवादीचा अहंकार नडल्याने आम्ही सर्व 70 जागा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपने केसाने गळा कापला ः परभणीत शिंदे गटाचा आरोप
शिंदे गटाबरोबर आघाडी करण्याची सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शेवटच्या क्षणी दगा दिला, आमचा केसाने गळा कापला, असा आरोप शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी केला. परभणीतील भाजप आणि शिंदे गटात जागावाटपाची चर्चा ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांनी उधळून लावली, असेही भरोसे म्हणाले. परभणी महापालिकेसाठी भाजप आणि शिंदे गट आता स्वतंत्र लढणार आहेत.
नागपूरमध्ये आमदार खोपडेंच्या मुलाचा भाजपला रामराम
नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा रोहित खोपडे याला उमेदवारी नाकारण्यात आली. यामुळे त्याने भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम केला.
नांदेडात भाजपकडून शिंदे गटाची गोची
नांदेडमध्ये भाजप आणि शिंदे गटात जागावाटपाची चर्चा सुरू होती. भाजपने हाताच्या बोटावर मोजण्याएवढय़ा जागा देऊ केल्या. भाजपने केलेला अपमान गिळून शिंदे गटाने चर्चा पुढे सुरू ठेवली. परंतु आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने सर्व जागांवर उमेदवार देऊन शिंदे गटाची गोची केली. राज्यात सत्तेत असलेले भाजप, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदे गट नांदेडात एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत.
राज्यात 16 महापालिकांत महायुतीत फूट
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी 16 महापालिकांत महायुतीत उभी फूट पडली. नवी मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, पुणे, पिंपरी–चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, धुळे, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर या महापालिकांच्या निवडणुकीत भाजप व शिंदे गट आमने-सामने येणार आहेत.
Comments are closed.