महापालिकांच्या निवडणुका कधी? राज्य निवडणूक आयोगाची आज पालिका आयुक्तांसोबत बैठक

राज्यातील 226 नगरपालिका आणि 38 नगर पंचायतींच्या निवडणुका टप्पा पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने उद्या (गुरुवारी) मुंबईसह 29 महापालिका आयुक्तांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत प्रारूप मतदार याद्या आणि निवडणूक तयारीबाबत माहिती घेतली जाणार आहे. महापालिका आयुक्तांची निवडणूक सज्जता लक्षात घेऊन आयोग सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांच्या संदर्भात सुधारित कार्यक्रम जाहीर होता. त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना देण्याची मुदत आज, बुधवारी संपली. प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची तारीख 10 डिसेंबर 2025 अशी आहे, तर 22 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार महापालिकांची तयारी पूर्ण झाली किंवा कसे याची माहिती आजच्या बैठकीत घेतली जाईल. मतदार यादी दुरुस्त करण्यास महापालिकांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केल्यास आणखी दोन ते तीन दिवस वाढवून देण्याची तयारी निवडणूक आयोगाने ठेवली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांकडून काय माहिती दिली जाते यावर निवडणुकीच्या तारखा आणि कार्यक्रम ठरणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.

नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेतील राजकीय आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांवर आणली जाणार आहे. त्यासाठी महिला खुला प्रवर्ग, इतर मागासवर्ग आणि इतर मागासवर्ग महिला या प्रवर्गासाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा परिषदांच्या पूर्वीच महापालिका निवडणुका

नागपूर, चंद्रपूर या दोनच महापालिकांनी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. परिणामी त्यात दुरुस्ती करून ही मर्यादा 50 टक्क्यांच्या आत आणून जिल्हा परिषदांच्याआधी महापालिकांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.

Comments are closed.