मुरबाडमध्ये हजारो बोगस, दुबार नावे सापडली; ग्रामसभेत मतदार यादीच्या वाचनाचा इफेक्ट

मुरबाड तालुक्यातील मतदार याद्यांमध्ये असलेली २५ हजार बोगस आणि दुबार नावे वगळण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने ग्रामसभेत सुरू केलेल्या मतदार यादी वाचनाच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या १५ दिवसांत या उपक्रमांतर्गत गावागावांत हजारो बोगस आणि दुबार नावे सापडल्याची माहिती गटविकास अधिकाऱ्याने दिली. हा उपक्रम सुरू करण्याच्या सूचना मुरबाडच्या तहसीलदारांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पंचायती समिती प्रशासनाला दिल्या होत्या. त्याचा इफेक्ट दिसू लागला असून त्यामुळे यादीतील दुबार नावे आता लवकरच वगळली जाणार आहेत.

मुरबाड तालुक्यात सन २००९ च्या विधानसभेला पंचवीस हजार बोगस मताची भर पडली होती. १५ वर्षांपासून मतदार यादीत घुसवलेली ही नावे कमी करण्यात आलेली नव्हती. प्रत्येक यादीतील शेकडो मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. काही मतदारांची नावे दुबार आहेत. निधन झालेल्या मतदारांची नावेही मतदार याद्यांमध्ये कायम ठेवण्यात आली आहेत. बोगस आणि दुबार नावे मतदार याद्यांतून वगळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवार यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली होती. या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन तहसीलदार अभिजित देशमुख यांनी मतदार याद्यांचे ग्रामसभेत वाचन करण्याच्या सूचना पंचायत समिती प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या १५ दिवसांपासून पंचायत समितीने हा उपक्रम सुरू केला आहे.

यादी तहसीलदारांना सादर करणार

तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार मतदार याद्यांचे ग्रामसभेत वाचन करण्याचा उपक्रम पंचायत समितीने सुरू केला आहे. त्याला प्रत्येक गावातून चांगला प्रतिसादही मिळत आहे. बीएलओ गावोगावी जाऊन हा उपक्रम रावबत आहेत. प्रत्येक यादीत दुबार आणि बोगस नावे आढळून येत आहेत. या नावांची यादी तयार करून ते कमी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या तहसीलदारांकडे पाठवण्यात येणार आहेत, अशी प्रतिक्रिया मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.