रेखा गुप्ता यांच्या कार्यक्रमात मुरदाबादचे घोषवाक्य

भाजप कार्यकर्त्याचीच आगळीक : पुन्हा सुरक्षेतील त्रुटी उघड

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत. शुक्रवारी गांधीनगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, अचानक एक व्यक्ती गर्दीत पोहोचली आणि ‘मुर्दाबाद’च्या घोषणा देऊ लागली. या घोषणाबाजीमुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. घोषणा देणारी व्यक्ती भाजप कार्यकर्ताच असल्याचे स्पष्ट झाले असून त्याने ही आगळीक नेमकी का केली? यासंबंधी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीनगर विधानसभेचे आमदार अरविंदर सिंह लवली हे व्यासपीठावरून भाषण करत असताना ही घटना घडली. याप्रसंगी कार्यक्रमात मुख्यमंत्री रेखा गुप्ता देखील उपस्थित होत्या. घोषणाबाजी सुरू होताच तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी सदर व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधिताला ताब्यात घेतले.

घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून प्रवीण शर्मा (60) असे त्याचे नाव आहे. तो गांधीनगर येथे अजितनगरचा रहिवासी आहे. तो टीव्ही केबलचा व्यवसाय करतो. प्राथमिक चौकशी त्याने आपण गेल्या 40 वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमादरम्यान प्रवीण शर्मा यांचा व्यापाऱ्यांशी वाद झाला आणि त्यानंतर त्याने आमदार लवली यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. आपला आवाज मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचे समजते. या घटनेदरम्यान व्हीआयपी सुरक्षेत कोणताही भंग झाला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनसुनावणीदरम्यान हल्ला झाला होता. त्या घटनेत अचानक एका व्यक्तीने व्यासपीठावर चढून मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. हाणामारीदरम्यान रेखा गुप्ता यांच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत हल्लेखोराला पकडले. त्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. आता ताज्या घटनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील त्रुटी उघडकीस आणल्या आहेत.

Comments are closed.