मुरुड-जंजिरा समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले, गुलाबी थंडीत ताज्या मासळीवर ताव

परतीचा पाऊस संपला आणि थंडीची चाहूल लागली आहे. शनिवार, रविवार सुट्टीदिवशी पर्यटकांनी मुरुड-जंजिरा येथे गर्दी केली होती. समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले होते. जंजिरा व पद्मदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. पर्यटकांनी गुलाबी थंडीत समुद्रकिनाऱ्यांवर मौजमजा करण्याबरोबरच ताज्या मासळीवर ताव मारला.
मुरुड समुद्रकिनारी असलेली सर्व हॉटेल रंगरंगोटी आणि रोषणाईने सजली आहेत. चविष्ट पदार्थांचे स्टॉल, घोडेसवारी, वॉटर बाईक यामुळे बीचवर गर्दी होती. नगरपालिकेने समुद्रकिनारी असलेले विश्रामधाम आणि बागेचे नूतनीकरण केल्याने त्याचा लाभ पर्यटकांना झाला. मुरुडपासून जवळच असणारे गारंबी धारण, कुडे मांदाड लेणी, खोकरी, दत्तमंदिर या पर्यटनस्थळावरही पर्यटकांची गर्दी होती. गेली तीन वर्षे कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय डबघाईला आला होता. या वर्षी दिवाळीपासून पर्यटन हंगाम चांगला आहे. पर्यटकांना आम्ही उत्तम सेवा देत आहोत असे हॉटेल व्यावसायिक मनोहर बैले यांनी सांगितले.
पिण्याचे पाणी, शहरातील रस्ते व समुद्रकिनारे स्वच्छ ठेवले आहेत. पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे. समुद्रात जाताना भरती ओहोटी याचे भान ठेवावे याबाबत पर्यटकांना मार्गदर्शन केले जात आहे.
सचिन बच्छाव, मुख्याधिकारी

Comments are closed.