मुशीर खानकडून 77 वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी! रवी शास्त्रींच्या खास क्लबमध्येही मुंबईच्या खेळाडूची एंट्री
रणजी ट्रॉफी २०२६-२७ मध्ये मुंबईचा अष्टपैलू मुशीर खानने उल्लेखनीय कामगिरीने सुवर्णाक्षरात आपल्या नावाची नोंद केली आहे. त्याने हरियाणाविरुद्धच्या सामन्यात आधी तर शतकी खेळी केली आणि नंतर गोलंदाजीमध्येही कहर केला. त्याने तब्बल ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळे मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्याचबरोबर मुशीरने ७७ वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली.
मुशीर भारतीय क्रिकेटपटू सरफराज खानचा धाकटा भाऊ आहे. मुंबई आणि हरियाणा यांचा सामना मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील शरद पवार अकॅडमीमध्ये (२६ ते ३० ऑक्टोबर) खेळला जात आहे. या सामन्यातील मुंबईच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना मुशीरने १०९ धावा केल्या होत्या. हे त्याचे प्रथम श्रेणीतील चौथे शतक होते. त्यामुळे मुंबईने पहिल्या डावात ४३० धावांचा डोंगर उभा केला.
हरियाणा जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा मुशीरने आपल्या फिरकीने त्यांना धक्के दिले. त्याने या हरियाणाच्या पहिल्या डावात ३१ षटकांत ८५ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने ७ षटके निर्धाव टाकली. त्यामुळे पाहुण्या संघाचा पहिला डाव २७० धावसंख्येवरच संपुष्टात आला. यामुळे त्यांना फॉलो-ऑन मिळाला आणि हरियाणाच्या दुसऱ्या डावातही मुशीरने २ विकेट्स घेतल्या.
मुंबईकडून ७७ वर्षांनंतर ऐतिहासिक विक्रमाची पुनरावृत्ती…
एकाच सामन्यात शतक आणि ६ विकेट्स घेणारा मुशीर हा मुंबईचा दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वीचा विक्रम १९४९ मध्ये दत्तू फडकर यांनी केला होता. त्यांनी १९४८-४९ रणजी ट्रॉफी हंगामात मद्रासविरुद्ध ही कामगिरी केली होती. आता जवळपास ७७ वर्षांत प्रथमच मुंबईच्या एखाद्या खेळाडूने रणजी ट्रॉफीच्या एकाच सामन्यात शतक आणि ६ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
मुशीर रवी शास्त्रींच्या यादीत सामील…
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात शतक आणि किमान ५ विकेट्स घेण्याच्या कामगिरी अप्रतिम मानले जाते. ही कामगिरी करणारा मुशीर मुंबईच्या सहावा खेळाडू ठरला. त्याच्याआधी दत्तू फडकर, विनू मंकड, पॉली उम्रीगर आणि रवी शास्त्री यांनी हा पराक्रम केला होता.
शास्त्री यांनी १९९१ मध्ये इंदौर येथे मध्यप्रदेशविरुद्ध १५८ धावा केल्या आणि ५ विकेट्सही घेतल्या होत्या. आता ३५ वर्षांनंतर मुशीर त्याप्रकारची कामगिरी केली आहे. (Musheer Khan created History in Ranji Trophy, he scored century and takes 6 wickets Mumbai vs Haryana 2026-27)
Comments are closed.