सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं
नवी दिल्ली : भारतातील इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सलग दुसऱ्या महिन्यात कमी झाली आहे. शेअर बाजारातील कमोजर स्थिती, वाढता भूराजकीय तणाव आणि व्यापाराचे प्रश्न यामुळं गुंतवणूकदार सतर्क झाल्यानं इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घडल्याचं असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस इन इंडियानं म्हटलं आहे.
इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली
अधिकृत आकडेवारीनुसार इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक जानेवारी महिन्यात 14.35 टक्क्यांनी घसरुन 24028.59 कोटी रुपये झाली आहे. डिसेंबर 2025 चा विचार केला असता ही आकडेवारी 25054.06 कोटी रुपये होती.
नोव्हेंबर 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 29911.05 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्यानंतर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत सलग दुसऱ्या महिन्यात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
जानेवारी 2026 मध्ये फ्लेक्सी कॅप फंडमध्ये मोठी घसरण झाली आहे. डिसेंबर 2025 मध्ये फ्लेक्सी कॅप फंडमध्ये 10019.27 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. ती जानेवारी महिन्यात 7672.36 कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच 2346.91 कोटी रुपयांनी फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक कमी झाली आहे.
लार्ज आणि मिडकॅप फंडमधील गुंतवणूक देखील जानेवारीत कमी झाली आहे. लार्ज कॅप फंडमध्ये डिसेंबर महिन्यातील गुंतवणूक 4093.51 कोटी रुपये होती ती कमी होऊन 3181.89 कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच 22.3 टक्के घसरण झाली आहे. मिड कॅप फंडमधील गुंतवणूक डिसेंबर महिन्यात 4175.81 कोटी रुपये होती त्यात घसरण होऊन जानेवारीतील गुंतवणूक 3185.47 कोटी रुपये झाली आहे.
स्मॉल कॅप फंडमध्ये थोडी बरी स्थिती पाहायला मिळाली. डिसेंबर महिन्यात स्मॉल कॅप फंडमधील गुंतवणूक 3823.82 कोटी रुपये झाली होती. ती कमी होऊन जानेवारी महिन्यात 2942.11 कोटी रुपयांवर आली आहे. म्हणजेच एकूण 881.71 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक कमी झाली असली तरी एसआयपीद्वारे होणारी गुंतवणूक कायम आहे. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीची रक्कम 31000 कोटींवर पोहोचली आहे. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमधील असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम 16.6 लाख कोटींवर पोहोचली आहे.
दरम्यान, भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून तेजीचं चित्र पाहायला मिळतंय. भारत आणि अमेरिका व्यापार कराराचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसतोय.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.