भारतीय क्रिकेटपटूने लपवले सर्वात मोठे दुःख; टी-20 वर्ल्ड कपपूर्वीच वडिलांचे निधन झाल्याचा केला खुलासा

भारतीय संघाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्माला (Jitesh Sharma) टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या संघात स्थान मिळाले नव्हते. टीम इंडिया या स्पर्धेत विश्वविजेती ठरली, तरीही जितेशला या स्पर्धेत न खेळल्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. जितेशने सांगितले की, वर्ल्ड कप खेळण्यापेक्षा त्याच्या वडिलांना त्याची जास्त गरज होती. टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच जितेशच्या वडिलांचे निधन झाले होते.
गेल्या वर्षीच्या आशिया कप 2025 पर्यंत जितेश शर्माकडे टीम इंडियाचा दुसरा पसंतीचा यष्टिरक्षक म्हणून पाहिले जात होते. मात्र, ईशान किशनचा (Ishaan kishan) फॉर्म अधिक चांगला असल्याने त्याला वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले आणि जितेशची संधी हुकली. या ऐतिहासिक विजयात ईशान किशन आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
‘पीटीआय’ (PTI) या वृत्तसंस्थेशी बोलताना जितेश म्हणाला, जेव्हा मला समजले की माझी संघात निवड झालेली नाही, तेव्हा मी निराश झालो होतो. मी सुद्धा एक माणूसच आहे, त्यामुळे वाईट वाटणे साहजिक होते. पण माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी मला या धक्क्यातून सावरण्यास मदत केली. त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले.
तो पुढे म्हणाला, मला नंतर जाणीव झाली की, वर्ल्ड कपपेक्षा माझ्या वडिलांना त्या वेळी माझी जास्त गरज होती. मला याबद्दल कोणतीही तक्रार किंवा मलाल नाही. उलट मी देवाचे आभार मानतो की, मला माझ्या वडिलांसोबत वेळ घालवता आला आणि त्यांच्या शेवटच्या दिवसांत मी त्यांच्यासोबत राहू शकलो.
Comments are closed.