माझे भविष्य BCCI च्या हातात, पण; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ०-२ कसोटी मालिकेतील पराभवानंतर गौतम गंभीर म्हणाला…

बुधवारी गुवाहाटी कसोटीत हिंदुस्थानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४०८ धावांनी पराभव पत्करावा लागला, जो धावांच्या बाबतीत सर्वात मोठा कसोटी पराभव होता. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत ०-२ असा व्हाईटवॉश झाला आणि २५ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर टीम इंडियाला पहिली मालीका गमवावी लागली.
यातच गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध ०-३ असा पराभव झाल्यानंतर घरच्या मालिकेत हिंदुस्थानी संघाचा हा दुसरा व्हाईटवॉश होता. या पराभवानंतर गौतम गंभीर यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आफ्रिकन संघाकडून झालेल्या पराभवानंतर बुधवारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खूप निराश झाले. ते म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश झाल्यानंतर बीसीसीआयला त्यांचे भविष्य ठरवावे लागेल. त्यांनी याची देखील आठवण करून दिली की, त्यांच्या कार्यकाळात संघाने अनेक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहेत.
गुवाहाटीमध्ये ४०८ धावांनी झालेल्या पराभवानंतर माध्यमांशी संवाद साधताना गंभीर असं म्हणाले. ते म्हणाले की, “माझे भविष्य बीसीसीआय ठरवेल, पण मी तोच व्यक्ती आहे, ज्याने तुम्हाला इंग्लंडमध्ये चांगला निकाल मिळवून दिला आणि तुम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली.” गंभीर या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये झालेल्या २-२ मालिका अनिर्णित आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदाचा संदर्भ देत होते.
गौतम गंभीर म्हणाले की, ““जबाबदारी सर्वांची आहे आणि सुरुवात माझ्यापासूनच होते. आम्हाला अधिक चांगले खेळायचे आहे. ९५/१ वरून १२२/७ असे कोसळणे. हे कदापि मान्य नाही. आपण एकट्या एखाद्या खेळाडूला दोष देऊ शकत नाही, चूक सर्वांची आहे. मी कधीही कोणाला वैयक्तिकरीत्या दोष दिला नाही आणि पुढेही देणार नाही.”

Comments are closed.