केरळमधील भाऊ, बहीण आणि आई यांचे रहस्यमय मृत्यू
जेपीएससी टॉपर शालिनीसह आयआरएस भाऊ व आईचा मृतदेह सापडला : हत्या की आत्महत्या याबाबत संदिग्धता
वृत्तसंस्था/ कोची, रांची
झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील टॉपर शालिनी विजय, तिचा भाऊ मनीष विजय आणि आई शकुंतला अग्रवाल यांचे मृतदेह केरळमधील कोची येथील कक्कनड येथे सापडले आहेत. मनीष विजय हे कक्कनडमध्ये केंद्रीय उत्पादन शुल्काचे अतिरिक्त आयुक्त (जीएसटी विभाग) होते. मनीष विजय यांच्या सरकारी निवासस्थानात तिन्ही मृतदेह सापडले असून या तिघांच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे. आईची हत्या केल्यानंतर मनीष विजय आणि शालिनी विजय यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तपास यंत्रणांकडून याप्रकरणी सखोल तपास सुरू असून ही हत्या की आत्महत्या याबाबत संदिग्धता असल्याचे बोलले जात आहे.
मनीष विजय हे जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे. ते मागील चार दिवस सुट्टीवर होते. मात्र, सुट्टी संपल्यानंतर देखील ते कामावर हजर न झाल्यामुळे सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईलवर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मनीष विजय यांच्या घरी जाऊन पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या शासकीय निवासस्थानी आईचा मृतदेह बेडवर पडला होता, तर शालिनी आणि मनीष यांचे मृतदेह फासावर लटकलेल्या स्थितीत होते. ही हत्या आहे की आत्महत्या? याचा केरळ पोलीस तपास करत आहेत. सध्या तरी या घटनेमागील कारणे स्पष्ट झालेली नाहीत. केरळ पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये शालिनी विजय नोकरीशी संबंधित आरोपांमुळे नाराज असल्यामुळे ही घटना घडली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. जेपीएससी फर्स्टमधील मेरिट घोटाळ्यात नाव आल्यानंतर शालिनी विजय नाराज झाली होती. ती आपल्या भावाकडे राहण्यासाठी केरळला गेली होती. भाऊ मनीष विजय आणि आई शकुंतला ह्या आधीच तेथे राहत होत्या.
आईच्या मृतदेहावर फुले
मनीष विजय गेल्या एका आठवड्यापासून त्याच्या ऑफिसला जात नव्हता. त्याचे सहकारी घरी पोहोचले तेव्हा घरातून तीव्र वास येत होता. नंतर, सहकाऱ्यांनी पोलिसांना कळवले आणि जेव्हा त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा त्यांना मनीष विजय आणि त्याची बहीण शालिनी विजय यांचे मृतदेह घराच्या आत दोरीला लटकलेले आढळले. तसेच आई शकुंतलाचा मृतदेह पलंगावर पडला होता. याप्रसंगी आईच्या पार्थिवावर फुले अर्पण केल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रथम आईचा मृत्यू झाला आणि नंतर मनीष विजय आणि त्याची बहीण शालिनी विजय यांनी आत्महत्या केली असा संशयही बळावला आहे.
घोटाळ्याची चौकशी अन् कारवाईची धास्ती
मनीष विजय 2011 मध्ये आयआरएस अधिकारी बनले. त्यांची पोस्टिंग कोची येथे होती. ते आपली आई शकुंतला अग्रवाल यांच्यासोबत राहत होते. तर जेपीएससी-1 मध्ये टॉप करणारी शालिनी विजय येथे डेप्युटी कलेक्टर पदावर कार्यरत होती. जेपीएससी मेरिट घोटाळा चौकशीच्या चौकटीत आल्यानंतर दीर्घ रजा घेऊन शालिनी विजय आपल्या भावासोबत राहण्यासाठी गेली होती. जेपीएससी मेरिट घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सीबीआयनेही त्यांना समन्स पाठवले होते. अटकेच्या भीतीने संपूर्ण कुटुंब चिंतेत होते आणि म्हणूनच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शालिनीला 15 फेब्रुवारी रोजी सीबीआयसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मनीष यांनी आपल्या सहकाऱ्यांना याबाबतची माहिती देताना शालिनीला तिची नोकरी गमवावी लागेल, असे बोलल्याचेही समजते. याप्रकरणी केरळ पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
Comments are closed.