एन जगदीसनने खेळली वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी, आजही रेकॉर्ड कायम!

लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम तामिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीसन (N Jagadeesan) याच्या नावावर आहे. जगदीसनने 21 नोव्हेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशविरुद्ध 141 चेंडूत 277 धावांची विक्रमी खेळी केली होती. या विक्रमी यादीत एडी ब्राउन (268 धावा) दुसऱ्या क्रमांकावर आणि रोहित शर्मा (264 धावा) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

एन जगदीसनने आपल्या या ऐतिहासिक खेळीत 25 चौकार आणि 15 षटकार लगावले होते. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 196.45 इतका होता. विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडूच्या या फलंदाजाने अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. त्याने 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये जगातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली.

विशेष म्हणजे, एन जगदीसनने याच हंगामात सलग पाच शतके झळकावण्याचा पराक्रम केला होता. एकाच हंगामात 5 शतके करणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याने विराट कोहली, पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड यांना मागे टाकले, ज्यांच्या नावावर एका हंगामात प्रत्येकी 4 शतके करण्याचा विक्रम होता.

या सामन्यात तामिळनाडूने 50 षटकांत 2 गडी गमावून 506 धावा केल्या होत्या. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 500 धावांचा टप्पा ओलांडणारा तामिळनाडू हा जगातील पहिला संघ बनला. तामिळनाडूने हा सामना 435 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला, जो लिस्ट-ए क्रिकेटमधील विजयाचा सर्वात मोठा फरक आहे.

जगदीसनच्या या खेळीने रोहित शर्माचा वनडेमधील 264 धावांचा भारतीय विक्रमही मागे टाकला. या कामगिरीनंतर जगदीसनची जगभरात चर्चा झाली होती. आजही लिस्ट-ए क्रिकेटमध्ये कोणालाही 277 धावांचा हा टप्पा ओलांडता आलेला नाही.

Comments are closed.