रंगसामी ते पाचव्यांदा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री.
राष्ट्रपतींची मंजुरी; शपथविधी सोहळा 13 मे रोजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एन. रंगस्वामी यांना पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दर्शवली आहे. राष्ट्रपतींनी एन. रंगस्वामी यांची पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केल्याचे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. ही नियुक्ती त्यांच्या शपथविधीच्या तारखेपासून प्रभावी होईल. गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनंतर नायब राज्यपाल के. कैलासनाथन यांनी एन. रंगस्वामी यांना राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. एन. रंगस्वामी आता बुधवार, 13 मे रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
गेल्या महिन्यात पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात इतर चार राज्यांसोबत विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. 4 मे रोजी जाहीर झालेल्या निकालांनुसार भाजपने आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमत मिळवून सत्ता मिळवली. तसेच ‘एआयएनआरसी’च्या नेतृत्वाखालील एनडीएने पुद्दुचेरीमध्ये मोठा विजय मिळवला. या विजयामुळे एन. रंगस्वामी पाचव्यांदा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. व्यवसायाने वकील असलेले रंगास्वामी त्यांच्या शांत आणि विनम्र स्वभावासाठी ओळखले जातात. आपला पक्ष सुरू करण्यापूर्वी ते काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. तथापि, पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी 2008 मध्ये पक्षाचा राजीनामा देत फेब्रुवारी 2011 मध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेसची स्थापना केली. त्यांनी आपल्या नवीन पक्षासोबत 2011 ची विधानसभा निवडणूक लढवली. 4 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालांनुसार, ऑल इंडिया एनआर काँग्रेस आणि भाजप युतीने बहुमताचा आकडा गाठत विजय मिळविलेला आहे.
Comments are closed.