एनएस राजा सुब्रमणि आगामी 'सीडीएस'
भारताचे तिसरे संरक्षण दल प्रमुख; व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन हे पुढील नौदल प्रमुख
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची नवे संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारने शनिवारी यासंबंधीची घोषणा केली. सुब्रमणी यांच्याकडे संरक्षण व्यवहार विभागाच्या सचिवपदाची जबाबदारीही असेल. याव्यतिरिक्त सरकारने व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांची पुढील नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. दोघेही 31 मे रोजी पदभार स्वीकारतील. विद्यमान सीडीएस अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे तिसरे सीडीएस असतील. ते सुमारे 39 वर्षांच्या सेवेनंतर 31 जुलै, 2025 रोजी उप-सेनाप्रमुख पदावरून निवृत्त झाले होते.
सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पुढील आदेशापर्यंत सुब्रमणी हे भारत सरकारच्या संरक्षण व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. ते 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी, त्यांनी 1 जुलै 2024 ते 31 जुलै 2025 पर्यंत लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम पाहिले होते. त्यांनी मार्च 2023 ते जून 2024 पर्यंत सेंट्रल कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणूनही काम पाहिले होते. लष्करी सेवेचा व्यापक अनुभव आणि अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर आता त्यांची देशाचे नवीन संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुब्रमणी यांनी भारतीय सैन्यात जवळपास 39 वर्षे सेवा बजावली आहे. त्यांना डिसेंबर 1985 मध्ये भारतीय लष्कराच्या गढवाल रायफल्स रेजिमेंटमध्ये कमिशन मिळाले होते. आपल्या प्रदीर्घ लष्करी कारकिर्दीत त्यांनी देशाच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवर अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. तसेच ऑपरेशनल तयारीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे भारतीय सैन्यात त्यांच्या शिस्त, नेतृत्व आणि सामरिक ज्ञानासाठी ओळखले जातात. सैन्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करत असताना त्यांनी देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
Comments are closed.