नैसर्गिक नाला बुजवला; नागोठण्यात पाणी घुसले, अनेक घरे पाण्याखाली, राष्ट्रीय महामार्ग कंत्राटदाराच्या भोंगळ कारभाराचा फटका

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कंत्राटदाराच्या भोंगळ कारभाराने नागोठणेकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. महामार्गावरील नवीन मोरीचे काम अपूर्ण असताना ठेकेदाराने जुना दगडी नाला बुजवल्याने पावसाचे पाणी थेट महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या अंगरआळीत घुसले. ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने काही क्षणात हाहाकार उडवला. पाण्याचे लोट इतिहासात पहिल्यांदाच अंगरआळीत आल्याने अनेक घरांमध्ये पाणीच पाणी झाले. यामुळे अन्नधान्याचे आणि अन्य वस्तूंचे नुकसान झाले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या बेफिकीरपणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत असून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सरकार मुंबई-गोवा महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याचे सांगत असले तरी आमटेम, पांडापूर ते नागोठणे-वाकणदरम्यान रस्त्याचे काम रखडले आहे. उड्डाणपूल, छोट्या मोऱ्यांचे काम अपूर्णच आहे. नागोठण्याच्या पूर्वेला असलेल्या डोंगरातून पावसाळ्यात येणारे पाणी वाहून नेण्यासाठी अंगरआळीच्या बाजूला महामार्गावर जुना मोठा नाला आहे. हा नाला चिरेबंदी असून कितीही पाऊस झाला तरी अंगरआळी, खडकआळी या भागात नाल्याचे पाणी घुसत नाही. मात्र नवीन मोरीचे काम अपूर्ण असताना कंत्राटदाराने अंगरआळीच्या तोंडावर असलेला जुना नाला बंद केला. त्यामुळे ढगफुटीसदृश झालेल्या पावसाचे पाणी नवीन मोरीसाठी टाकलेल्या पाइपांमधून थेट अंगरआळीत घुसले. घटनेची माहिती मिळताच सरपंच सुप्रिया महाडिक, सदस्य सचिन ठोंबरे, ज्ञानेश्वर साळुंखे, भाविका गिजे, भरत गिजे यांनी परिस्थितीची पाहणी केली.
पोलीस धावले मदतीला
अंगरआळीमध्ये पाणी घुसल्याचे कळताच नागोठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळावर धाव घेतली. जेसीबी बोलावून नवीन नाल्याच्या तोंडावर माती टाकून पाण्याचा प्रवाह बंद केला. त्यापूर्वी बंद केलेल्या जुन्या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह सुरू केला. सचिन कुलकर्णी यांच्या कार्यतत्परतेचे नागोठणेकरांनी कौतुक केले.

Comments are closed.