चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली
नागपूर क्राईम न्यूज : होळीच्या उत्साहात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने कोराडी परिसर हादरला आहे. अंगावर रंग उडवल्याच्या क्षणिक रागातून आजीकडून चार वर्षांच्या नातवावर गरम पाणी फेकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारात ओम हरीश वांगे (वय 4) हा गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Nagpur Crime News: नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओम हा घराबाहेर पिचकारीने रंग खेळत होता. दरम्यान, त्याची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर तापवलेले पाणी बादलीत भरून घराकडे नेत होत्या. त्याच वेळी ओमने पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला.
Nagpur Crime News: कमरेखालचा भाग भाजला
अचानक झालेल्या या प्रकारामुळे संतापलेल्या आजीने हातात असलेली गरम पाण्याची बादली क्षणिक प्रतिक्रियेतून थेट ओमच्या अंगावर ओतली. उकळते पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने आरडाओरडा करू लागला. पाण्याच्या तीव्र उष्णतेमुळे त्याचा कमरेखालचा भाग गंभीररीत्या भाजला. आवाज ऐकून कुटुंबीय धावून आले.
Nagpur Crime News: स्वतःची चूक लक्षात येताच…
दरम्यान, स्वतःची चूक लक्षात येताच आजीनेही तातडीने बादलीतून थंड पाणी घेऊन ओमच्या अंगावर टाकले. कुटुंबीयांनीही त्वरित थंड पाणी टाकून प्राथमिक मदत केली. मात्र जखम गंभीर असल्याने ओमला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Nagpur Crime News: घटना सीसीटीव्हीत संपूर्ण
ही संपूर्ण घटना घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असून संबंधित आजीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. निरागस बालकाच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या या अमानुष कृत्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. या घटनेमुळे सणांच्या उत्साहातही संयम आणि संवेदनशीलता राखण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.