नागपूरच्या गोधनी जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन वायूची गळती; 50 हून अधिक नागरिकांची प्रकृती खालावली, परिसरात घबराट
नागपूर जवळील गोधनी येथील उधाननगर परिसरात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी मध्यरात्री क्लोरीन वायूची भीषण गळती झाल्याची घटना घडली. वायूचा वास पसरल्याने आजूबाजूच्या परिसरातील 50हून अधिक नागरिकांना उलट्या, मळमळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. घटनेची माहिती मिळताच बाधित नागरिकांना तातडीने वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास गोधनी जलशुद्धीकरण केंद्रातील 900 किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलिंडरमधून ही गळती सुरू झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस, आपत्कालीन सेवा, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जलशुद्धीकरण केंद्राच्या 200 मीटर त्रिज्येचा परिसर ‘नो-मॅन्स-लँड’ म्हणून घोषित केला आणि रस्ते बंद करून परिसरातील वस्त्या तातडीने रिकाम्या केल्या. या दुर्घटनेत बाधित झालेल्या 56 नागरिकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यामध्ये सुमारे आठ जणांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले असून तीन ते चार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, मात्र सर्व बाधितांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारानंतर 12 जणांना घरी सोडण्यात आले असून सध्या 40 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत एका कुत्र्याचा मृत्यू झाला आहे.
व्हिडिओ | नागपूर, महाराष्ट्र: गोधनी जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन वायूची गळती झाल्याने ४० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मानकापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हरेश काळसेकर म्हणाले, “गोधनी नगर पंचायत अंतर्गत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात काल रात्री क्लोरीन वायूची गळती झाल्याची माहिती मिळाली. pic.twitter.com/qCpDvfdM26
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) 24 ऑगस्ट 2026
संयुक्त बचाव पथकांच्या तत्परतेमुळे गॅस गळती सुमारे 90 टक्क्यांपर्यंत यशस्वीपणे थांबवण्यात यश आले असून परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सोमवारी मध्यरात्री गोंधणी नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्रावर क्लोरीन वायू गळतीच्या घटनेची माहिती आली होती. रात्री 12.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. काही लोक स्वतःच रुग्णालयात जात होते, तर अनेक लोकांना पोलिसांनी आपल्या वाहनाने किंवा खाजगी वाहनाने रुग्णालयात पाठवले. सुरुवातीला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येथे बचाव मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये स्थानिक नगरसेवकही उपस्थित होते. त्यांच्या संपर्कातून येथील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. काही वेळानंतर एनडीआरएफ, अग्निशामक दल आणि ओसीएम या एजन्सी दाखल झाल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे मोहीम राबवून येथील बहुतांश वायू गळतीवर आता सकाळी 9 वाजेपर्यंत पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती मानकापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरेश काळसेकर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
Comments are closed.