इंद्रजित सावंत धमकी प्रकरण – आरोपीला पकडण्यासाठी कोल्हापूरचे पथक नागपूरमध्ये

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्याविरोधात कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आज कोल्हापूर पोलिसांचे पाच जणांचे पथक नागपूरमध्ये दाखल झाले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. दरम्यान, आरोपी चार दिवसांपासून फरार असून त्याचा फोन स्विच ऑफ असल्याचे पोलिसांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज यांना कोणी पकडून दिले, याचा वस्तुनिष्ठ इतिहास समोर आणल्यानंतर नागपुरातील प्रशांत कोरटकरने सोमवारी मध्यरात्री पह्न करून सावंत यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दलसुद्धा अपशब्द वापरले होते. धमकी दिल्याप्रकरणी कोरटकर याच्याविरोधात कोल्हापूरमध्ये जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापुरातून पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली पथकामध्ये पाच पोलिसांचा समावेश असून पोलीस त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मोबाईल स्विच ऑफ असल्याने अद्याप माहिती मिळालेली नाही.
6 मार्चला कोल्हापूर बंद
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना ठार मारण्याची धमकी देणारा नागपूरचा प्रशांत कोरटकर पोलीस संरक्षण असतानाही पळून गेलाच कसा? एकतर त्याला सरकारचेच अभय आहे, नाहीतर गृह खात्याने झोपेचे सोंग घेतलेले आहे. त्यामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे अन् दुसरीकडे त्यांचाच अवमान करणाऱ्यांना सुरक्षा द्यायची हा दुटप्पीपणा महाराष्ट्र सहन करणार नाही, असे ठणकावत फरारी कोरटकरला त्वरित अटक करावी अन्यथा येत्या 6 मार्चला कोल्हापुरात येणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांना अडवून याचा जाब विचारू, प्रसंगी कोल्हापूर बंद करू, असा इशारा येथील इंडिया आघाडीकडून देण्यात आला.
कोरटकरकडून आलेली धमकी तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत जी गरळ ओकली, तो स्वतःचा मोबाईल इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी स्वतःहून आज दुपारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दिला.
Comments are closed.