गाडीवरील दगड हल्ला प्रकरण, पोलिसांचा खोटारडेपणा जनतेसमोर आणणार

विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनिल देशमुख यांच्या गाडीवर झालेला हा हल्ला बनावट असल्याचा दावा नागपूर ग्रामीण पोलिसांनी सत्र न्यायालयात सादर केलेल्या ‘बी फायनल’ अहवालात केला आहे. तसेच हल्ल्याचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याने पुढील तपासाची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. मात्र, या हल्ला प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरच जनतेसमोर आणून पोलिसांचा खोटारडेपणा आपण सर्वांसमोर आणणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अनिल देशमुख हे नरखेडहून काटोलला परतत असताना 19 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यासंर्भातील चौकशी पूर्ण होऊन फॉरेन्सिक अहवाल येण्याच्या आधीच राजकीय दबावापोटी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी ही घटना खोटी असल्याचे सांगितले होते. तर हल्ला होताच लगेच देवेंद्र फडणवीस यांनी ही ‘सलीम जावेद’ची स्टोरी असल्याचे सांगितले होते. या प्रकरणात सुरुवातीपासूनच राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

फॉरेन्सिक अहवालातून सत्य समोर

अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल आता समोर आला आहे. यामध्ये दोन व्यक्तींकडून देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. एकाने मोठा दगड गाडीच्या समोरच्या काचेवर व दुसऱ्याने मागील बाजूस दगड मारला. या घटनेत गाडीची काच फुटून देशमुख यांना कपाळाला गंभीर दुखापत झाल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे. यावरून अनिल देशमुख यांनी राज्य सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करत कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.

Comments are closed.