अरेच्या! नागपूरच्या सर्पमित्राने सीपीआर देऊन सापाला दिले जीवदान

माणसांना सीपीआऱ दिला जातो हे सर्वांना माहित आहे मात्र नागपूरच्या एका सर्पमित्राने चक्क एका सापालाच सीपीआर देऊन जीवनदान दिले आहे. नागपूरातील हिंगना गावात ही घटना घडली असून हर्षल शेंडे असे त्या सर्पमित्राचे नाव आहे. त्यांच्या या कृतीचे नागपूरात सगळीकडे कौतुक होत आहे.

हिंगना येथे राहाणारे हर्षल शेंडे यांना एका घरात साप असल्याची माहिती मिळाली. ते तत्काळ तिथे पोहोचले त्यावेळी त्यांनी एक कुकरी साप एका ड्रमाखाली फसल्याचे पाहिले. मात्र त्यावेळी सापाची हालचाल काहीच दिसत नव्हती. सापाची अवस्था वाईट होती. अशावेळी हर्षलच्या लक्षात आले की, त्या सापाला सीपीआरची गरज आहे. त्याने त्याला पाणी पाजले. थोडेसे पाणी प्यायल्यानंतर सापाची हालचाल जाणवू लागली. त्यानंतर हर्षलने एका पाईपच्या मदतीने सापाला सीपीआर द्यायला सुरुवात केली. हर्षलने पाईपची एकबाजू सापाच्या तोंडात टाकली. तो पाईप सापाच्या तोंडात नीट जाण्यासाठी एका बाजूने कापसाने कव्हर केले. त्यानंतर पाईपचे दुसरे टोक आपल्या तोंडात घेतले आणि सापाला सीपीआर द्यायला सुरुवात केली. सीपीआर दिल्यानंतर साप हालचाल करु लागला. तिथे उभे असलेले सर्व लोकं त्याची ही कृती पाहून थक्कच झाले. त्यानंतर सर्पमित्र हर्षलने त्याला जंगलात सोडले. ते म्हणाले कुकरी साप विषारी नसतो.

हर्षल म्हणाले की, साप बेशुद्धावस्थेत होता त्याला तत्काळ सीपीआऱ दिला नसता तर तो मेला असता. त्यावेळी त्याचा जीव वाचविण्यासाठी तो एकमेव पर्याय होता. त्यामुळे त्याने सापाला पाणी पाजल्यानंतर सीपीआर देऊन वाचविले.

Comments are closed.