कारगिलमध्ये फिरायला गेलेली नागपुरातील महिला रहस्यमयरित्या बेपत्ता; चर्चेला उधाण, शोध सुरू

नागपूर बातम्या: नागपूर येथील 43 वर्षीय महिला 15 मे रोजी लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील शेवटच्या गावातून रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. सुनीता जामगडे असे बेपत्ता झालेल्या या महिलेचे नाव असून ती कारगिल मधील भारतीय सीमा रेषेच्या (LOC) जवळून बेपत्ता झाल्याची माहिती आहे. तर ती पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) आपल्या 12 वर्षीय मुलासोबत गेली असता सुनीता बेपत्ता झाल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर या बाबतची माहिती कुटुंबियांना समजताच त्यांच्या मुलाने स्थानिक पोलिसांना त्याच्या बेपत्ता आई बाबत माहिती दिली.

सुनीता ही नागपूरच्या (Nagpur) कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत कबिरनगरमध्ये राहत होती. आधी ती एका रुग्णालयात नर्स म्हणून ही काम करायची. दरम्यान, पाकिस्तानमधील एका धर्मगुरुसोबततिची ऑनलाइन ओळख झाल्याची माहिती असून ती त्यांनाच भेटण्याच्या उद्दिष्टानेच   कारगिलमधून एलओसी तर पार केली नाही ना? असाही संशय व्यक्त केला जात आहे.

12 वर्षीय मुलासोबत काश्मीरला गेली, कारगिल मधील शेवटचे गावातून बेपत्ता

प्राथमिक माहितीनुसार, सुनीता जामगडे ही गेले अनेक महिने त्या धर्मगुरूला भेटण्यासाठी प्रयत्न करत होती. त्याच प्रयत्नात तिने काही महिने पूर्वी पंजाबमधील अमृतसरच्या अटारी चेकपोस्टमधून पाकिस्तानला जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणेने तिला परत पाठवले होते. अशातच 14 मेला सुनीता तिच्या 12 वर्षीय मुलासोबत काश्मीरला गेली. यावेळी कारगिल मधील शेवटचे गाव ‘हुंदरमान’मध्ये तिला पाहण्यात आले होते. त्यानंतर तिला कोणीच पाहिले नाही. बराच वेळ जेव्हा सुनीता परत आली नाही. तेव्हा स्थानिकांनी 12 वर्षीय मुलाला स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांकडून तपास सुरू

सुनीताची मानसिक स्थिती सामान्य नसून नागपूरच्या शासकीय मनोरुग्ण रुग्णालयात तिचे नियमितपणे उपचार सुरू असल्याची ही माहिती आहे. नागपुरातून निघताना ही तिने आपल्या कुटुंबीयांना अंधारात ठेवले होते. तर मुलाला कपडे घेऊन देते असं सांगून सुनीता घरातून बाहेर गेल्याची माहिती सुनीताची आई निर्मला जामगडे यांनी दिली आहे. सध्या 12 वर्षीय नातू हा काश्मीरमध्ये पोलीस ठाण्यात असून सुनीता बाबत स्थानिक कपिलनगर पोलिसांकडून विचारणा करण्यात आल्याचे ही आईने सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.