नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास, नवीन टॉवरबाबत म्हाडा देणार धडे; रहिवाशांना दिली जाणार माहिती

नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नवीन टॉवरमध्ये दिल्या गेलेल्या सोयी-सुविधा व त्यांची काळजी कशी घ्यावी याची माहिती येथील रहिवाशांना म्हाडाकडून दिली जाणार आहे.

ही माहिती देण्यासाठी परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ हॉल येथे म्हाडाकडून खास सादरीकरण केले जाणार आहे. यासाठी रहिवाशांना कुपने दिले जाणार आहेत. याचे एक पत्रक म्हाडाने जारी केले आहे. हे कुपन गणेश बारकडे, जितेंद्र जाधव व दिनेश राऊत या अधिकाऱयांकडे रहिवाशांना मिळतील, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

8 ऑक्टोबरला सादरीकरण

विविध सोयी-सुविधांच्या माहितीचे सादरीकरण 8 ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी प्रवेशाकरिता रहिवाशांकडे कुपन असणे आवश्यक आहे, असे म्हाडाने पत्रकात नमूद केले आहे.

864 घरांचा ताबा लवकरच

नायगाव येथील ब ब्लॉकमधील बीडीडी चाळींचा पुनर्विकास आधी सुरू झाला. येथील 4 ते 8 क्रमांकच्या टॉवरचे काम अंतिम टप्प्यात आहे. येथील 864 घरांचा ताबा लवकरच रहिवाशांना दिला जाईल, असेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

पार्किंगसाठी आग्रही

वरळीप्रमाणे नायगाव येथील पुनर्विकासात प्रत्येक घरामागे एक पार्ंकग द्यावी, अशी आग्रही मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. या मागणीला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई व माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्याकडे याबाबत रहिवाशांनी विनंती केली होती.

Comments are closed.