नजाफगडला नारगड असे नाव दिले पाहिजे: भाजपचे आमदार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीत भाजप सत्तेवर आल्यावर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात नजफगढचे नाव बदलण्याची मागणी गुरुवारी झाली आहे. नजफगढच्या आमदार नीलम पहलवान यांनी रेखा गुप्ता सरकारसमोर ही मागणी केली आहे. भाजप आमदाराने नजफगढचे नाव बदलून ते नाहरगढ करण्याची मागणी केली आहे. सरकारकडून या मागणीवर सध्या उत्तर देण्यात आले नसले तरीही सत्तारुढ आमदारांनी याचे स्वागत केले आहे.
विधानसभेच्या शून्य प्रहरात नीलम पहलवान यांनी हा मुद्दा उपस्थित केला. माझा मतदारसंघ हा दिल्ली ग्रामीणमधील आहे. तेथे हरियाणाची सीमा तीन बाजूने लागून आहे. मुघल शासक आलम द्वितीयने आमच्या भागात मोठ्या प्रमाणात अत्याचार केले होते. 1857 च्या लढ्यात भाग घेत राजा नाहर सिंह यांनी नजफगढ क्षेत्राला दिल्ली प्रांतात सामील केले होते. अनेकदा विनंती करूनही नजफगढचे नाव बदलण्यात आले नाही. प्रवेश वर्मा यांनी खासदार असताना याकरता प्रयत्न केले होते अशी आठवण नीलम यांनी करून देताच भाजप खासदारांनी या मागणीला समर्थन दर्शविले.
नजफगढचे नाव बदलण्यास पूर्ण सभागृह, आमच्या मुख्यमंत्री आणि सर्व आमदार पाठिंबा देतील ही अपेक्षा असल्याचे नीलम यांनी म्हटले आहे. शाह आलम द्वितीयच्या फौजेचा सरदार मिर्झा नजफ खानच्या नावावर या भागाला नजफगढ हे नाव देण्यात आले होते. महान क्रांतिकारक आणि वल्लभगड संस्थानचे राजे नाहर सिंह यांचे नाव नजफगढला देण्यात यावे अशी भूमिका भाजपने मांडली आहे. 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात राजा नाहर सिंह यांचे मोठे योगदान होते. राजा नाहर सिंह यांना इंग्रजांनी चांदनी चौकमध्ये फासावर लटकविले होते.
Comments are closed.