तीन वर्षे, 3500 इव्हेंट आणि 25 लाख श्रोते! ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा

तीन वर्षे, 3500 इव्हेंट आणि 25 लाख प्रेक्षक असे सांस्कृतिक वैभव अनुभवणाऱया आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱया वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’चा तिसरा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी दिमाखात पार पडला. सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

देशातील सर्वात मोठे सांस्कृतिक केंद्र अशी ओळख असलेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची स्थापना मार्च 2023 मध्ये करण्यात आली होती. आतापर्यंत या सांस्कृतिक केंद्रात 3500 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 10 हजार 500 पेक्षा जास्त कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी दिली आहे. तब्बल 25 लाख प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी या सांस्कृतिक केंद्राच्या तिसऱया वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहून नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. सचिन तेंडुलकर, जावेद अख्तर, शबाना आझमी, सलमान खान, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, रणवीर सिंह, शाहीद कपूर, ए. आर. रहमान, अनन्या पांडे, नीतू कपूर, सोनाली बेंद्रे अशा अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थित राहत सांस्कृतिक केंद्राच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तीन दिवस कार्यक्रमांची रेलचेल

एनएमएसीसीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारपासून चार दिवस विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, शनिवारी एक सूर – भारत की आवाज, एक मुलाकात आणि स्वयं सितार कॉन्सर्ट तर रविवारी चिरंतन, प्रिय भाई – एक कविता हवी आहे हे कार्यक्रम सादर होणार आहेत. कल्चरल सेंटरमधील ग्रँड थिएटर, द स्टुडिओ थिएटर आणि द क्युब येथे हे कार्यक्रम होणार आहे.

गौरवशाली तीन वर्षे

आज नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राने तीन गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या संस्कृतीत तीन हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राची सुरुवात केली तेव्हा आम्ही हिंदुस्थानातील सर्वोत्तम जगासमोर आणण्याचे आणि जगातील सर्वोत्तम हिंदुस्थानात आणण्याचे वचन दिले होते. आम्ही ते वचन पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या देशातील कलाकारांना जागतिक स्तरावर प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे ‘एनएमएसीसी’च्या अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यावेळी म्हणाल्या.

Comments are closed.