Nana Patole Congress criticized Saif Ali Khan gets stabbed in Bandra Home
मुंबई : “पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.” अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. गुरुवारी (16 जानेवारी) अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी आलेल्या चोराने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. (Nana Patole Congress criticized Saif Ali Khan gets stabbed in Bandra Home)
हेही वाचा : Lakshmi Nivas : जयंतने सांगितला जान्हवीच्या बर्थडे सीनचा मजेशीर किस्सा
“महायुती सरकारमध्ये गुंडाराज फोफावला असून सैफ अली खानवर हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला दिलेले आव्हान आहे. महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावले असून हे सरकारचे अपयश आहे.” असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, “भाजप सरकारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या लाडक्या पोलीस महासंचालक अत्यंत निष्क्रीय आहेत. मुंबईला दोन पोलीस आयुक्त असूनही ना राज्यात कायदा सुव्यवस्था आहे ना मुंबईत.” अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
“बीडमधील संघटीत गुन्हेगारी आणि त्याला असलेले राजकीय आशिर्वाद, परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू, वांद्र्यात माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार या गंभीर घटना आहेत. गृहमंत्री पद सांभाळण्यात फडणवीस अपयशी ठरले. राज्यात सोलिब्रिटी, सत्ताधारी पक्षाचे नेते, सर्वसामान्य जनता कोणीही सुरक्षित नाही.” असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. “गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. राज्यात गुन्हेगारी वाढत असताना फडणवीस गंभीर नसल्याचे दिसत आहे. अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. असा निष्क्रीय आणि कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,” असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
Comments are closed.