Nana Patole warns that Congress will bring privilege motion against Chief Minister Devendra Fadnavis rrp


लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह नाना पटोले यांनी आज सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयाची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा दिला आहे.

परभणी : परभणीमध्ये 10 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांनी एलएलबी तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याला ताब्यात घेतले होते. यानंतर त्याचा कोठडीतच मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा दिला आहे. (Nana Patole warns that Congress will bring privilege motion against Chief Minister Devendra Fadnavis)

लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नाना पटोले हेही होते. माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, वास्तविकता लपवण्याचे पाप सरकार करत आहे, हे आता सिद्ध झालं आहे. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. सोमनाथ सूर्यवंशीला बेदम मारहाण झाली होती. डॉक्टरांनी पहिलं सर्टिफिकेट दिलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, सूर्यवंशीच्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर जखमा होत्या. त्यात सूर्यवंशीचा मृत्यू झाला. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सूर्यवंशीला श्वास घेण्याचा त्रास होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण मुख्यमंत्री खोट बोलले आहेत. त्यांनी विधानसभेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही हक्कभंग आणू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

– Advertisement –

हेही वाचा – CM Fadnavis : जाती-जातीमध्ये भेद निर्माण करण्याचे राहुल गांधींचे काम; काँग्रेस नेत्यांच्या परभणी भेटीवर मुख्यमंत्र्यांकडून टीका

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी पुढेचं पाऊल काय टाकणार आहेत? असा प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी संबंधित भूमिका लोकसभेत मांडतील. सरकारचं पितळं उघडं करेल. कारण ज्या पद्धतीने ठरवून मागासवर्गीयांना, बहुजनांना आणि अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्याचं काम भाजपा करत आहेत, हे या ठिकाणी दिसलेले आहे. म्हणून या सर्व गोष्टींचा आवाज लोकशाही पद्धतीने काँग्रेस प्रत्येक ठिकाणी उचलेल.

– Advertisement –

सूर्यवंशीच्या हत्याऱ्यावर कडक कारवाई करण्याचा प्रयत्न

दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांना काय आश्वासन दिले? असा प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, त्यांच्या पाठीशी काँग्रेस उभी राहणार आहे. त्यांना पूर्ण मदत केली जाईल. तसेच सूर्यवंशी यांची ज्याने हत्या केली आहे, त्याला सोडलं जाणार नाही. हत्या करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल, अशा पद्धतीचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाईल.

हेही वाचा – Rahul Gandhi : सोमनाथ सूर्यवंशींची पोलिसांकडून हत्या करण्यात आली; राहुल गांधींची मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरही टीका


Edited By Rohit Patil



Source link

Comments are closed.