नाना शंकरशेट स्मारकाची उद्या पायाभरणी, वडाळ्यातील भूखंडावर साकारणार तीन मजली भव्य वास्तू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, शिक्षण महर्षी आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार नाना शंकरशेट यांच्या स्मारकाचा उद्या शनिवारी पायाभरणी समारंभ होणार आहे. वडाळा दोस्ती एकर्स येथील भूखंडावर नानांचे तीन मजली भव्य स्मारक साकारणार असून सकाळी 10 वाजता होणाऱया सोहळय़ात नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नत्ती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांच्या स्मारकासाठी शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक अॅड. मनमोहन चोणकर यांनी पाठपुरावा केला होता. तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी वडाळा येथील भूखंड स्मारकासाठी देण्याचे आदेश दिले. शिवसेनेच्या प्रयत्नांमुळेच नानांचे भव्य स्मारक साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी पालिकेने 12 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. तीन मजली स्मारक साकारण्याचा संकल्प नाना शंकरशेट प्रतिष्ठानने सोडल्याची माहिती प्रतिष्ठानचे सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर यांनी दिली. या सोहळय़ास नानाप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन चोणकर यांच्यासह प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर दाभोळकर यांनी केले आहे.

मिनिएचर्स, शैक्षणिक दालन, ग्रंथालय, अभ्यासिका, संग्रहालय

नानांनी मोठी आर्थिक मदत देऊन साकारलेल्या शैक्षणिक वास्तू, रुग्णालये, त्यांचा पुरातन वाडा, मंदिरे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (बोरीबंदर रेल्वे स्टेशन) यासारख्या अनेक वास्तूंचे मिनिएटर्स या स्मारकात असणार आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, प्रशिक्षण पेंद्र, वाचनालय व मार्गदर्शनासाठी भव्य सभागृह, नानांच्या जीवनावरील विविध लेखकांनी लिहिलेली पुस्तके, लेख, नानांचा जीवनपट मांडणारी दुर्मिळ चित्रे, संग्रहालय, संस्कृत अभ्यास दालन या स्मारकात असणार आहेत.

Comments are closed.