'नंदा देवी'चे आगमन, इंधन वायू घेऊन

भारतात स्वयंपाकाच्या गॅसची स्थिती सुधारणे शक्य

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतात स्वयंपाकाच्या गॅसची स्थिती आता आणखी सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी गुजरातमधील मुंद्रा बंदरात आगमन झालेल्या ‘शिवालिक’ या वायूवाहक नौकेनंतर आता मंगळवारी ‘नंदा देवी’ नामक आणखी एक नौका गुजरातच्या वाडीनार बंदरात आलेली आहे. ही नौका भारताच्या ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ ची आहे. या नौकेत 47 हजार टन द्रवीभूत पेट्रोलियम गॅस असल्याची माहिती देण्यात आली असून गेल्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन वायू भारतात आला आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नंदा देवी ही नौका पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गुजरातमधील कांडला बंदरात आणली जाणार होती. तथापि, धोरणात्मक परिवर्तन करुन ती वाडीनार बंदरात आणण्यात आली आहे. या बंदरात नौकेतून गॅस लवकर अनलोड करण्याची सोय आहे. त्यामुळे गॅसच्या अनलोडिंगसाठी फारसा वेळ लागणार नाही. अनलोडिंग झाल्यानंतर इंधन वायू त्वरित देशभर वितरणासाठी पाठविला जाणार आहे. भारताची इंधन वायूची दैनंदिन आवश्यकता साधारणत: 1 लाख टन इतकी आहे.

तामिळनाडूला 24 हजार टन देणार

गेल्या दोन दिवसांमध्ये भारतात 92 हजार 700 टन इंधन वायू आलेला आहे. यापैकी 24 हजार टन वायू तामिळनाडूला पाठविण्यात येणार आहे. इतर राज्यांनाही त्यांच्या मागणीनुसार तो पाठविण्यात येणार आहे. ही वाहतूक होण्यासाठी साधारणत: आणखी दोन दिवस लागू शकतात, असे स्पष्ट केले गेले.

‘जग लडकी’ही येण्याच्या वाटेवर

आखाती देशांमधील कच्चे इंधन तेल घेऊन ‘जग लडकी’ ही तेलवाहू नौका भारताच्या मार्गावर आहे. ती पुढच्या तीन दिवसांमध्ये येऊन पोहचण्याची शक्यता आहे. या नौकेत 81 हजार टन कच्चे इंधन तेल असून ते प्रथम मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेही भारताला आणखी दिलासा मिळू शकणार आहे.

सातत्याने चर्चा

भारताने सातत्याने इराणच्या प्रशासनाशी चर्चा चालविली आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर हे इराणच्या मंत्र्यांची चर्चा करीत आहेत. भारताच्या तेलवाहक आणि वायूवाहक नौकांना होमुझच्या सामुद्रधुनीतून विनासायास बाहेर पडता यावे, यासाठी ही चर्चा आहे. गेल्या चार दिवसात भारताच्या अनेक नौका अशा प्रकार सुखरुप बाहेर पडल्या आहेत. आणखी जवळपास 22 वायूवाहक नौका सध्या आखातात असून त्यांनाही होमुझची सामुद्रधुनी पार करण्यासाठी अनुमती मिळण्याची प्रतीक्षा आहे. या सर्व नौका येत्या काही दिवसांमध्ये भारतात आल्या, तर भारताची गॅस परिस्थिती आणखी सुधारेल, असे स्पष्ट केले जात आहे.

Comments are closed.