'नंदनवन' पुन्हा एकदा पर्यटकांसह भरभराट होईल

जम्मू काश्मीरमधील 12 पर्यटनस्थळे खुली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर होती बंद

सर्कल संस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेली पर्यटनस्थळे खुली करण्यास प्रशासनाने अनुमती दिल्यामुळे ‘नंदनवन’ पुन्हा पर्यटकांनी बहरणार आहे. काश्मीरमध्ये येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी पर्यटनस्थळे पुन्हा उघडण्यात आली आहेत. सर्व ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता बाळगली जाणार आहे.

गेल्या काही दिवसात राज्यात पुन्हा स्थिरस्थावर वातावरण निर्माण होऊ लागल्यानंतर जम्मू काश्मीर प्रशासनाने 12 पर्यटनस्थळे पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा संस्था आणि जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यापक आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले. काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने या निर्णयाचे स्वागत करत नजिकच्या काळात निर्बंध लादण्यात आलेली सर्व ठिकाणे पुन्हा उघडण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने काश्मीर विभागात सात आणि जम्मू विभागात पाच पर्यटनस्थळे पुन्हा उघडली आहेत. यामध्ये काश्मीरची अरु व्हॅली, राफ्टिंग पॉइंट यन्नार, अक्कड पार्क, पादशाही पार्क, कमांड पोस्ट आणि कठुआमधील दमन टॉप, रामबन आणि धागर आणि रियासीतील सलालमधील शिव गुहा यांचा समावेश आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर अनेक ठिकाणे बंद

22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात प्रवास करणाऱ्या पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे 26 पुरुष पर्यटक ठार झाले होते. या घटनेनंतर, भारतीय लष्कराने 7 मे रोजी पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू करून नऊ दहशतवादी अ•s उद्ध्वस्त केले. याच कालावधीत काश्मीरमधील वातावरण तणावपूर्ण बनल्यामुळे पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्यात आली होती. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील 87 पर्यटनस्थळे बंद करण्यात आली होती. यापूर्वी, प्रशासनाने जूनमध्ये 16 पर्यटनस्थळे पुन्हा उघडली होती.

स्थानिकांकडून प्रशासनाचे आभार

पहलगामच्या पर्यटन व्यवसायावर दहशतवादी हल्ल्याचा विशेष परिणाम झाला आहे. आता पुन्हा उघडलेली बहुतेक ठिकाणे पहलगाम आणि त्याच्या आसपास आहेत. येथील लोकांनी उपराज्यपालांचे आभार मानले. येथील बहुतांश लोकांची उपजीविका पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. परंतु आता पहलगामला पुन्हा मोठ्या संख्येने पर्यटक भेट देणार असल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त केला.

पर्यटन व्यवसायाला चालना

काश्मीरमध्ये पुन्हा पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने येथील थांबलेल्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. काश्मीरमधील पर्यटनस्थळे बंद झाल्यामुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यांची संपूर्ण उपजीविका पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक बऱ्याच काळापासून बंद पर्यटनस्थळे पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहेत. प्रशासन ही पर्यटनस्थळे पुन्हा सुरू करणार असल्यामुळे त्यांच्या थांबलेल्या रोजगाराला चालना मिळेल आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल, असे पहलगाममधील एक शोरूम मालक तनवीर अहमद यांनी सांगितले.

Comments are closed.