‘तलवार बाबा’च्या अटकेनंतर बिलोलीत राडा! समर्थकांचा पोलीस स्थानकात धुडगूस, पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडली, फिर्यादही फाडली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अंगात आल्याचा बनाव करून तलवारीच्या धाकावर गोरगरीब जनतेची फसवणूक करणाऱ्या कथित ‘तलवार बाबा’ उर्फ ज्ञानेश्वर करडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या कारवाई दरम्यान बाबाच्या समर्थकांनी बिलोली पोलीस ठाण्यातच धुडगूस घालत पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बडूर येथील ज्ञानेश्वर नागोराव करडे हा गेल्या काही काळापासून दैवी शक्तीचा दावा करत होता. हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणे आणि जादूटोण्याच्या नावाखाली लोकांची आर्थिक व मानसिक फसवणूक करणे असे त्याचे कारनामे सुरू होते. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी 29 मार्च रोजी रात्री त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

रात्री 9.30 च्या सुमारास पोलीस कर्मचारी माधव तोटेवाड हे फिर्याद लिहित असताना, बाबाचे दोन कट्टर समर्थक शिवकांत शिवराम मैलारे आणि नबाजी बाबा वाघेकर यांनी पोलीस ठाण्यात प्रवेश केला. त्यांनी आरडाओरडा करत पोलिसांच्या हातातील फिर्यादीचा कागद हिसकावून फाडून टाकला. शिवकांत मैलारे याने थेट पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. आरोपींनी पोलिसांना धक्का देऊन खाली पाडले. या झटापटीत पोलीस अधिकाऱ्याच्या खाकी वर्दीची बटणे तुटली.

विशेष म्हणजे, कोठडीत असलेल्या ‘तलवार बाबा’नेही शांत राहण्याऐवजी समर्थकांना “या साहेबांना सोडू नका” अशी चिथावणी देऊन कायदा हातात घेण्यास प्रवृत्त केले. यावेळी आरोपींनी “तुला एकट्यात गाठून बघून घेतो,” अशी धमकीही आरोपींनी यावेळी पोलिसांना दिली. पोलीस ठाण्यातील या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपी शिवकांत मैलारे, नबाजी वाघेकर आणि ज्ञानेश्वर करडे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 132, 221, 121(1), 49 आणि 3(5) नुसार गुन्हे दाखल केले आहेत. भोंदूगिरी करणाऱ्या आणि कायद्याचा सन्मान न राखणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Comments are closed.