कर्ज काढून लेकीचं लग्न लावलं, पण 12 दिवसात नववधूचा दुर्दैवी शेवट, विष पाजलं अन् 1 लाखासाठी जीव

नांदेड : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली, त्यानंतर हुडांबळी आणि पैशांसाठी मानसिक आणि शारिरीक छळाच्या अनेक घटना समोर आल्या, एकिकडे अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावलं उचलावी अशी मागणी होत असतानाच आता नांदेडमध्ये एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी बळी गेल्याचं समोर आलं आहे. ताऊबाई चव्हाण असं या नवविवाहीतेचं नाव आहे. या नवविवाहितेला तिच्या सासरच्या लोकांनी विष देऊन मारल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पतीसह सासू-सासऱ्याला अटक केली आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच तिचा असा दुर्दैवी अतं झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर तिच्या माहेरच्या लोकांनी गंभीर आरोप केले आहेत.

…म्हणून विवाहितेला संपवलं

मिळालेल्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथील ताऊबाई हिचा विवाह 2 जुलै रोजी राठोडवाडीच्या सुधाकर राठोड याच्यासोबत झाला होता. लग्नात हुंडा म्हणून ठरलेली रक्कम पूर्ण न दिल्यामुळे सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केल्याचा, आरोप आहे. ताऊबाईच्या माहेरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळी 6 लाख रुपये हुंडा देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार त्यांनी 5 लाख रुपये दिले होते. मात्र, उर्वरित 1 लाख रुपयांसाठी नवविवाहीत ताऊबाईला विष पाजलं. 9 जुलै रोजी ताऊबाईला अचानकपणे उलट्या होऊ लागल्या. तिला आधी मुखेडमध्ये रूग्णालयात नेलं आणि नंतर हैदराबादमध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं. परंतु,13 जुलै रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

1 लाख कमी दिल्यानं लेकीला मारलं, कुटुंबियांचा आरोप

नवविवाहित मृत ताऊबाईच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हुंड्यासाठीच तिला विष देऊन मारण्यात आलं. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती, सासू आणि सासरे या तिघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी सांगितलं की, विवाहितेला विष पाजन्यात आलं आहे की तिने स्वतः विष प्राशन केलं याचा तपास सुरु आहे.

आपल्या लाडक्या लेकीसाठी तिच्या वडिलांनी कर्ज काढून तिच्या लग्नासाठी पैसे जमा केले होते. मात्र, हुंड्यात मागितलेल्या पैशांमध्ये केवळ एका लाख रुपयांसाठी तिच्या सासरच्या लोकांनी तिचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून परिसरात शोक व्यक्त होत आहे. वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेऊन लेकीचा विवाह चांगला थाटामाटत लावून दिला होता. मात्र एक लाखासाठी सासरच्या मंडळींनी तिचा खून केला असल्याचं ताऊबाईच्या नातेवाईकांनी सांगितलं. या घटनेनं पुन्हा एकदा संताप व्यक्त होत आहे, तर नव्या नवरीचा असा दुर्दैवी शेवट झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.