प्रशासनाने संपर्क साधला असता तर क्षीरसागरची आत्महत्या टळली असती
काल दुपारी नांदेड तालुक्यातील बोरगाव तेलंग येथील शेतकर्याने सोशल मिडीयावर आपली व्यथा व्यक्त करत गळफास घेतला होता. मात्र त्याच्या कर्जमाफी संदर्भात प्रशासनाने संपर्क साधला असता तर हि आत्महत्या टळली असती, अशी माहिती समोर आली आहे.
आपल्या मुलीच्या शिक्षणाच्या प्रश्नाबाबत व तिची फी कशी भरावी या विवंचनेत असलेल्या बोरगाव तेलंग येथील शंकर आबानराव क्षीरसागर यांनी आपली व्यथा सोशल मिडीयावर मांडत गळफास घेवून आत्महत्या केली होती. घेतलेले कर्ज कसे फेडावे, सोयाबीनचे पिक हातातून गेले, मुलीची फिस माफ झाल्याची सरकारने घोषणा केली, प्रत्यक्षात माफ झाली नाही. या विवंचनेत त्याने आत्महत्या केली होती. त्यासंदर्भात प्रशासनाकडून आज मिळालेल्या माहितीनुसार शंकर क्षीरसागर याने १६ सप्टेंबर २०२३ रोजी एक लाख ६० हजार रुपयांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याने ते थकीत झाले होते. ३१ मार्च २०२६ रोजी त्यांच्या कर्ज खात्यावर दोन लाख आठ हजार १०४ रुपये थकबाकी होती. शासनाच्या कर्जमाफीत त्याचे दोन लाखाचे कर्ज माफ झाले होते. वरील आठ हजार १०४ रुपये भरल्यानंतर हि कर्जमाफी होणार होती. आपल्या कर्जमाफीबाबत कुठलाही संदेश वा निरोप बँकेकडून वा प्रशासनाकडून मिळाला नसल्याने ते निराश होते. प्रत्यक्षात कर्जमाफीची यादी जाहीर झाल्यानंतर गावपातळीवर तलाठी व ग्रामसेवकाने कर्जधारकांना त्याची माहिती द्यायला हवी होती. सरकारी कर्मचार्यांच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या असून, त्यांना गावपातळीवर काम करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. कर्जमाफीची माहिती त्याला मिळाली असती तर क्षीरसागरने आत्महत्या केली नसती. प्रत्यक्षात प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधायला हवा होता, असे झाले असते तर एका शेतकर्याची आत्महत्या टळली असती, अशी माहिती समोर आली आहे.
Comments are closed.