Nanded News – अतिवृष्टीने तोंडचा घास हिरावला, हताश शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं; मुलाच्या विरहात आईचाही मृत्यू
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यात शेतातील पिके वाहून गेली. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. सूर्यकांत मंगनाळे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून, याने शेतातच गुरुवारी गळफास घेवून आत्महत्या केली. तरुण मुलाच्या दुःखाच्या विरहाने शुक्रवारी आईनेही प्राण सोडले. मायलेकाच्या मृत्यूमुळे फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे.
देऊबाई मंगनाळे असे मयत आईचे नाव आहे. नापिकी, कर्ज त्यातच अतिवृष्टीने पिकांची नासधूस झाली. सर्व पीक अतिवृष्टीत वाहून गेले. हे सर्व पाहून हताश झालेल्या अल्पभूधारक शेतकरी सूर्यकांत लक्ष्मणराव मंगनाळे (46) याने शेतातच गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलाच्या मृत्यूनंतर त्याचा विरह सहन न झाल्याने आई देऊबाई मंगनाळे यांनीही शुक्रवारी सकाळी प्राण सोडला. गुरुवारी मुलावर तर शुक्रवारी ऐन पोळ्याच्या दिवशी आईवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. देऊबाई मंगनाळे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, दोन सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
बँकेकडून काढलेले कर्ज, पेरणीसाठी सावकाराकडून घेतलेले पैसे कसे फेडावे या विवंचनेतून सूर्यकांत मंगनाळे यांनी आत्महत्या केल्याचे गावकर्यांनी सांगितले. सरकारच्या संवेदना आता तरी जाग्या व्हाव्यात आणि शेतकर्यांची कर्जमाफी व्हावी, अशी मागणी गावकर्यांकडून होत आहे.
Comments are closed.