Nanded news – तेरवीच्या जेवणावरून परतताना भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू, शहापूरवर शोककळा
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर येथील रहिवासी शेषाबाई गौराजी यंजपवार (वय -68) आणि त्यांचा मुलगा पंढरी गौराजी यंजपवार (वय – 55) यांचा शुक्रवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहापूर गावासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेषाबाई आणि पंढरी हे दोघे मायलेक मेनूर येथे आपल्या एका नातेवाईकाच्या तेरवीच्या जेवणासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून शहापूरकडे परतत असताना रात्री मदनूर रस्त्यावर त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. हा अपघात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
यंजपवार कुटुंबावर गेल्या काही दिवसांतील हे सलग दुसरे संकट आहे. काही दिवसांपूर्वीच पंढरी यंजपवार यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच हा भीषण अपघात घडला. मयत पंढरी यांच्या पश्चात आता वृद्ध वडील आणि तीन मुली असा परिवार आहे.
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या एका मुलीचा साखरपुडा झाला होता. अधिक महिना संपल्यानंतर घरात लग्नाची सनई वाजणार होती. मात्र, घरात आनंदाचे कारज ठरत असतानाच काळाने घाला घातला. घरात मंगल कार्य होण्याऐवजी ही अमंगल घटना घडल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.
Comments are closed.