महापालिका निवडणूक- भाजपने निष्ठावंतांना डावललं, नांदेडच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षात मानापमान नाट्य रंगले. निष्ठावंतांचे तिकीट कापल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे अनेकांनी नाराजी व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

उमेदवार निवडून यायच्या पात्रतेवर भाजपाचे प्रभारी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी शहरात सर्वेक्षण करुन अखेर आज एबी फार्म वाटण्यास सुरुवात केली. यात चैतन्यबापू देशमुख, भानुसिंह रावत, माजी नगरसेवक दिलीपसिंह सौढी, नंदकुमार कुलकर्णी, काँग्रेसचे रविंद्रसिंघ बुंगई, नांदेड दक्षिण मधील उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांचे चिरंजीव कुणाल कंदकुर्ते, मोहनसिंह तौर आदींची तिकीटे कापण्यात आल्याचे आज दुपारी तीन वाजता स्पष्ट झाले. बहुतांश काँग्रेसमधून आलेल्या उमेदवारांना तिकीटे मिळाल्याने तसेच अनेक काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आल्याने निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यात संतापाचे वातावरण पसरले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी चैतन्यबापू देशमुख यांच्या नावाच्या शिफारस केल्यानंतर सुध्दा चव्हाणांनी आपला हट्ट कायम ठेवला आणि पक्षश्रेष्ठींना आपला निर्णय कळविला. उमेदवार निवडून येण्याच्या शक्यतेवर उमेदवारी जाहीर केल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले. या सर्व बाबीमुळे भारतीय जनता पक्षात प्रचंड असंतोष पसरला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आशिष नेरलकर, महेश उर्फ बाळू खोमणे यांना उमेदवारी शेवटच्या टप्प्यात जाहीर करण्यात आली. आज दुपारी अडीच वाजता सर्व 81 उमेदवारांचे एबी फार्म चार झोनमधील निवडणूक कार्यालयात भारतीय जनता पक्षातर्पेâ दाखल करण्यात आले.

पक्ष संघटनेत महत्वाची भूमिका बजावणार्‍या या दिग्गजांचे तिकीट कापल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांत मात्र नाराजी पसरली आहे. याचे पडसाद येणार्‍या निवडणुकीत उमटून येण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या 81 जागेवर स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने याठिकाणी महायुती पूर्णतः संपुष्टात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आता कुठलीही चर्चा याबाबत आम्हाला करायची नाही, असे स्पष्ट संकेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने मित्र पक्षांना दिले आहेत.

Comments are closed.