Nanded News – महिनाभरापासून पावसाची दांडी, हताश झालेल्या शेतकर्‍यांनी सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नांदेड जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी त्रस्त झालेत. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. याच भावनेतून हताश झालेल्या पिंपळगाव महादेव येथील शेतकर्‍यांनी आज (08 सप्टेंबर 2026) आपल्या सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवून आपल्या भावनांना वाट करुन दिली.

गेल्या महिनाभरापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. गेल्या महिन्यात दोन दिवस पाऊस झाल्याने पिके बहारली होती. सोयाबीनचे पीक देखील डौलत होते. सोयाबीनवर फुले येण्याची वाट बघत असतानाच पावसाने दडी मारली. गेल्या महिनाभरापासून पाऊस तर नाहीच तर कडक उन पडले आहे. तापमान ३८ अंशापर्यंत पोहंचले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. याच भावनेतून हताश झालेल्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील मोहन कल्याणकर या शेतकर्‍याने आपल्या शेतातील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवला.

याबाबत बोलताना मोहन कल्याणकर म्हणाले की, यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाला. मात्र, गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली. कोरडेठक आभाळ त्यात तापमानाचा चटका यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जात आहे. त्यामुळे हताश होवून आपण आपल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. जगण्याच्या यावर्षीच्या आशा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या आहेत, आता आम्ही काय करायचे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

सबंध जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या घोषणेकडे व मदतीकडे शेतकर्‍यांचे डोळे लागले आहेत. मोठ्या प्रमाणात आशा पल्लवित करुन कर्ज काढून पेरणी केली. मात्र निसर्गाने साथ न दिल्याने कल्याणकर सारख्या शेतकर्‍यांनी हताश होवून ट्रॅक्टरद्वारे शेतीतील पिक नांगरुन टाकले आहे.

Comments are closed.