Nanded News – बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई, तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

नांदेड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारून पाचच दिवस झालेल्या राहुल कर्डिले यांनी बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाला रडारवर घेतले असून शिक्षण विभाग सर्व परीक्षा सुरळीत चालू असल्याचे सकाळी सांगत असताना दुपारी मात्र जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांना भेटी देत धडक कारवाई केली. या कारवाईत परीक्षेशी संबंध नसलेल्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच तीन केंद्रप्रमुख व आठ पर्यवेक्षकांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच कॉपी पुरवणाऱ्या आठ जणांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दि. 11 फेब्रुवारी बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कंधार तालुक्यातील विविध परिक्षा केंद्राना भेटी दिल्या. यादरम्यान, परिक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा त्यांना आढळून आल्या नाहीत. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर उपस्थित होते. त्यांनी याबद्दल गंभीर आक्षेप घेतले असून शिक्षणाधिकाऱ्यांना भेटी दरम्यान तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. नोटीस बजावलेल्या केंद्र संचालकामध्ये भीमशंकर उच्च माध्यमिक विद्यालय, शिराढोण, ता. कंधार, श्री. गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, चिखली ता. कंधार, नेताजी सुभाषचंद्र उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी ता. कंधार यांचा समावेश आहे. याशिवाय परिक्षा केंद्रामध्ये कोणतीही जबाबदारी सोपवली नसताना उपस्थित असणाऱ्या तीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्युनियर कॉलेज पानभोसी येथील सहशिक्षक श्रीमती दहीहंडे गवळी, श्रीमती एम.ए. खान, लिपिक ए.यु.शेख यांचा समावेश आहे.

याशिवाय परीक्षेदरम्यान नकला करण्यास मदत करणाऱ्या बाहेरील व्यक्ती श्रीनिवास अर्जून भुसेवाड, प्रणव अनिल टोम्पे, गणपत जळबा गायकवाड, दस्तगीर खमरोद्दीन, शिवाजी नारायण कदम यांच्यावर भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 126 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. उस्मान नगर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर यांनी यासंदर्भात गुन्हे नोंदविले आहेत.याशिवाय डी.जी.खरात, एस.एस. नरंगले, सी.डी.सोनटक्के, एस.जी.पाटील, ए.एस. जोगदंड, एम.जी.कांबळे, एस.एम. केंद्रे, एस.बी.गायकवाड या आठ पर्यवेक्षकांनी वर्गामध्ये स्वतः आय कार्ड न वापरणे, बैठक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे, त्यांची आवश्यक तपासणी न करणे, याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात आजपासून 107 परीक्षा केंद्रावर बारावीची परिक्षा सुरु झाली आहे. आज इंग्रजीच्या पेपरला 41 हजार898 पैकी 40 हजार 950 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 97.52 टक्के उपस्थिती होती.नांदेड जिल्ह्यात कोणत्याही केंद्रावर, कुठेही कॉपी करणाऱ्यांची हयगय करू नये, पोलिसांनी सक्त कारवाई करावी. शिक्षण विभागाने आवश्यक सुविधा पूर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

Comments are closed.