Nanded News – मंत्र्यांच्या दौर्‍याचा दिखावा बंद करा; मुहूर्त काढून दुष्काळ जाहीर करू नका, रोहित पवार आक्रमक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्रातील २८० तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, एकट्या नांदेड जिल्ह्यात तब्बल ५ लाख हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापूस यांसारखी मुख्य पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, केवळ पाहणी दौऱ्यांचे नाटक न करता सरकारने तातडीने ५० हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

आज नांदेड जिल्ह्यातील तळणी आणि कंचननगरसह सहा गावांना भेट देऊन त्यांनी थेट शेताच्या बांधावर जात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी शेतकरी पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसून आले असून, खरिपाचे संपूर्ण पीक वाया गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रोहित पवारांनी या दौऱ्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेती उत्पादनापेक्षा लागवड व मशागत खर्चच अधिक असल्याचे सांगत, कुठल्याही निकषाची किंवा पीक कापणी अहवालाची वाट न बघता सरकारने सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी तातडीचे अनुदान द्यावे आणि मजुरांना सरसकट २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी केली. वेळेची वाट न बघता तात्काळ पंचनामे सुरू करून ही मदत दिली पाहिजे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेणार असताना मंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यांचा फार्स कशासाठी चालवलाय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ५ ऑक्टोबरपर्यंत कशासाठी थांबायचे याचे उत्तर सरकारने द्यावे, असे सांगत मंत्र्यांनी रिल्स बनवण्यासाठी आणि फोटोसेशन करण्यासाठी दौरे करू नयेत, असा घणाघात त्यांनी कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करताना केला. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर, उपाध्यक्ष तातेराव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.