शेतकऱ्यांनी भाजप आमदाराचे अडवले वाहन, ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी

बारड (ता. भोकर) येथे शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून प्रति एकर ५० हजार रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (३० सप्टेंबर २०२५) रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी भोकरहून नांदेडकडे जाणाऱ्या भाजप आमदार राजेश पवार यांचे वाहन शेतकऱ्यांनी अडवून त्यांना जाब विचारला. सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर न केल्यास पुढच्या वेळी वाहन फोडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला, यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

शेतकऱ्यांनी सकाळपासून बारड येथे रास्ता रोको सुरू केला होता, ज्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आमदार राजेश पवार यांचे वाहन आंदोलनस्थळी आल्याने शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालत संतप्त सवाल केले. “शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले असताना तुमचे सरकार बघ्याची भूमिका घेते. ओला दुष्काळ जाहीर करणार की नाही? ५० हजार रुपये प्रति एकर मदत देणार की नाही?” असे प्रश्न विचारत त्यांनी आमदारांना धारेवर धरले. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून आमदारांचे वाहन पुढे मार्गस्थ केले.

Comments are closed.