Nanded Rain – अवकाळी पावसाने नांदेडला झोडपलं; शहर जलमय, तुंबलेल्या नाल्यांमुळे अनेक घरांत शिरलं पाणी
शहर व जिल्ह्यात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावस पडला. पावसामुळे नायगाव तालुक्यात वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाल्याने शहर पाच तास अंधारात होते.
हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. रात्री सात ते आठच्या सुमारास शहर व जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे शहरात लावलेले होर्डिंग्ज जमीनदोस्त झाले. तर काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. या अवकाळी पावसाचा फटका नायगाव, मुखेड, कंधार, लोहा, अर्धापूर, मुदखेड, बारड परिसरासह नांदेड शहरालाही बसला. नायगाव तालुक्यात एका 30 वर्षीय व्यक्तीच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
फडणवीससाहेब, भांडणातून लक्ष बाहेर काढा आणि महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्या – आदित्य ठाकरे
तसेच शहराच्या बोरबन फॅक्टरी भागात एका चारचाकी वाहनावर झाड कोसळले. पाऊस सुरू होताच महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शहर पाच तास अंधारात होते. महानगरपालिकेने नाल्याची साफसफाई केली नसल्याने घाण पाणी रस्त्यावर आले. तर सखल भागात लोकांच्या घरांमध्येही पाणी शिरले. नांदेड शहरातील रस्ते जलमय झाले होते. अचानक आलेल्या पावसाने खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची धांदल उडाली. श्रीनगर महावीर चौक या भागात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मार्गातही बदल करावा लागला. यासोबतच शहराच्या देगलूर नाका, इस्लामपुरा, वसंतनगर, खडकपुरा, विष्णूनगर, मगनपुरा आदी सखल भागात नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
जायकवाडी धरणावरील चारीचे पाणी फळबाग-पिकांत घुसल्याने शेतात पाणीच पाणी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
अर्धापूर तालुक्यात तसेच बारड परिसरात केळी, पपई यासह बागायती पिकांची मोठी नुकसान झाली. शहरातील नवीन मोंढा भागात व्यापाऱ्यांनी उघड्यावर ठेवलेले हळद व अन्य धान्य झाकण्यासाठी एकच घाई करण्यात आली. तुफान पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. अजूनही रात्री उशिरापर्यंत शहराचा वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. मागील काही दिवसापासून तापमान प्रचंड वाढल्याने या पावसामुळे मात्र नांदेडकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
Comments are closed.