निष्ठावंताना डावलल्याने धर्माबादेत भाजपमध्ये गटबाजीला उधाण! शिवसेनेचा झंझावात

धर्माबाद नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून, भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी वाटपात निष्ठावंतांना डावलण्यात आले. त्यामुळे भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून, निष्ठावंत प्रचारापासून कोसोदूर आहे. यातच आ. राजेश पवार यांनी आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवल्याने खा.अशोक चव्हाण यांच्या समसर्थकांचा गट नाराज झाल्याचे चित्र दिसून येत आहे. खा. चव्हाण समर्थक म्हणून ओळख असलेले महेश उर्फ शंकर बोल्लमवार यांनी मराठवाडा जनहित पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवित असल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या झंझावात प्रचारामुळे शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
धर्माबाद नगरपालिकेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सय्यद चंदा हमीदसाब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वैशाली विनायकराव कुलकर्णी, भारतीय जनता पक्षाकडून जंगमपल्ली सुनीतागौड रमेश गौड, काँग्रेसकडून सविता शंकरराव पाटील, मराठवाडा जनहित पार्टी संगीता महेश बोलमवार, बहुजन समाज पार्टीकडून शेख तसलीमबी फातेमा युनुस, मिंधे गटाकडून चाकरोड अंशाबाई गंगारेड्डी, समाजवादी पार्टीकडून खान अनिस फातेमा युनुस व अपक्ष म्हणून विजयालक्ष्मी लक्ष्मण सोनटक्के हे ९ उमेदवार रिंगणात आहेत तर २२ नगरसेवक पदासाठी १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून तिकीट वाटपात अनेक रंगत घडामोडी घडल्या. तिकीट वाटपात भाजपचे आ. राजेश पवार यांनी खा.अशोक चव्हाण यांच्यावर कुरघोडी करीत आपल्या समर्थकांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवून दिली. यानंतर खा. चव्हाण यांचे समर्थक तसेच भारतीय जनता पक्षातील जुने व निष्ठावंत कार्यकर्ते यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आ.राजेश पवार यांनी धर्माबाद नगरपालिका निवडणुकीत भाजपची धुरा सांभाळल्यानंतर नाराज झालेले खा.अशोक चव्हाण, माजी आ.अमरनाथ राजुरकर यांचे समर्थक महेश उर्फ शंकर बोलमवार यांनी मराठवाडा जनहित पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी चे २२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. हाच प्रयोग मराठवाडा जनहित पार्टीच्या माध्यमातून बिलोलीत देखील करण्यात आला. बिलोलीत भाजपाचे कमळ हद्दपार झाले असून, संतोष कुलकर्णी त्याठिकाणी मराठवाडा जनहित पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तसेच त्यांचे समर्थक सर्वच २० जागी याच पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत. यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. तसेच खा.अशोक चव्हाण व माजी आ.अमरनाथ राजूरकर यांनी धर्माबाद नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. तसेच निष्ठावांतांना डावल्याने तेही भाजपच्या प्रचारापासून कोसोदूर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी सय्यद चंदा हमीदसाब यांना उमेदवारी देण्यात आली असून सध्या माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकर, उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी, तालुकाप्रमुख मारोती पाटील कागेरू, संचालक शिवराज पाटील मोकलीकर, शहरप्रमुख बालाजी बनसोडे, गणपत कात्रे, वीरभद्र भद्रू, रामचंद्र रेड्डी, अशोक मोमोड, विठ्ठल हडपे, डॉ. अनिल रत्नाळीकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते व कार्यकर्ते धर्माबाद शहर पिंजून काढीत असून प्रचाराचा झंझावत दौरा करीत असल्याने शिवसेनेला मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकात धडकी भरली आहे.

Comments are closed.